निलिमा चव्हाणचा मृत्यू घातपात नाहीच; पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांचे स्पष्टीकरण

रत्नागिरी:- चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील निलिमा चव्हाण हिचा मृतदेह दाभोळ खाडीत आढळल्यानंतर पोलिसांनी सर्व बाजुने तपास केला आहे. निलिमाच्या अंगावर कोणत्याही जखमा नव्हत्या. डोके, भुवयांवरील गेलेले केस मृतदेह कुजण्याच्या प्रक्रियेमुळे जाऊ शकतात असा अभिप्राय असा अभिप्राय केईएम रूग्णालयाच्या तज्ञांनी दिला आहे. त्यामुळे निलिमा चव्हाण हिचा घातपात झालेला नाही हे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. परंतु निलिमाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे व्हिसेराचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. अंतिम निष्कर्षापर्यंत पोलीस निलिमा चव्हाण मृत्युप्रकरणाचा तपास सुरू ठेवणार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक श्री.धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक सौ.जयश्री गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

निलिमाच्या खांद्याला तिची बॅग होती. मात्र ज्याने ती बॅग उचलली होती ती त्याने भीतीपोटी पुन्हा जगबुडीच्या पात्रात फेकून दिली. या बॅगेचा शोध घेण्यासाठी ८० कर्मचारी दोन दिवस जगबुडी ते दाभोळ खाडी असे सर्च ऑपरेशन करीत आहेत. अद्याप बॅग पोलिसांच्या हाती लागली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

घटनेच्या दिवशी निलिमा खेड बसस्थानकातून चिपळूणला जाण्यासाठी ज्या बसमध्ये बसली होती त्या बसच्या वाहकाचे रेकॉर्ड पोलिसांनी तपासले आहे. एक महिला भरणे नाका येथे उतरल्याचे रेकॉर्डमध्ये नमूद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच भरणे नाका येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती ब्रिजकडे जाताना दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
व्हिसेराकडे लक्ष या प्रकरणात पोस्टमार्टेम अहवाल घातपात नसल्याचे स्पष्ट करीत असल्याने व्हिसेरा तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आला आहे. चार दिवसात त्याचा अहवाल अपेक्षित असून या अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.