नियोजित वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेत बदल: ना. सामंत

कापडगाव, दांडेआडोम ऐवजी जिल्हा रुग्णालय, मनोरुग्णालय, महिला रुग्णालय एकत्र जोडून उभारणार 

रत्नागिरी:- रत्नागिरीतील वैद्यकीय महाविद्यालय कापडगाव, दांडेआडोम ऐवजी जिल्हा शासकीय रुग्णालय, मनोरुग्णालय आणि महिला रुग्णालय एकत्र जोडून तिथे सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी निकषांचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. 

येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की वैद्यकीय महाविद्यालयाची प्रक्रिया मोठी असते. ती पूर्ण करणे सोपे नाही. त्यासाठी सुमारे 460 कोटीचा आवश्यकता आहे. दापोलीत कॉलेज होण्यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आश्‍वासन दिलेले नाही. तशी मागणी तेथील आमदार योगेश कदम यांनी केली होती; परंतु शासकीय रुग्णालयाजवळच वैद्यकीय महाविद्यालय सुरु करता येत असल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या तिथे होऊ शकणार नाही. एकाच ठिकाणी 25 एकर जागा आवश्यक असते. याबाबत आमदार कदम यांची आम्ही समजूत काढू. नवीन आमदार असल्यामुळे आपल्या मतदारसंघात विकास कामे करवून घेण्यासाठी प्रयत्न असतो. त्यामुळे कदम यांनी मागणी केली. या कॉलेजसाठी निश्‍चित केलेली कापडगाव येथील जागेवर एक नवीन मोठा प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.
रत्नागिरी पालिकेच्या पालिकेच्या नळपाणी योजनेचा आढावा घेण्यात आला. त्या कामासाठी 65 कोटी मंजूर असून 40 टक्के काम पूर्ण झाले. आतापर्यंत 21 कोटी ठेकेदाराला दिले आहेत. ठेकेदाराने काम बंद ठेवल्यामुळे 9 कोटीचा बोजा पालिका स्वतःच्या फंडातून उचलणार असल्याचा गैरसमज विरोधक पसरवत आहेत. पण ती वस्तूस्थिती नाही. 15 व्या वित्तच्या निधीतून 8 कोटी मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यात सव्वा कोटी निधी प्राप्त झाला आहे. या कामावर देखरेख ठेवण्यासाठी समिती स्थापन केली आहे. तसेच शहरातील तारांगणाचे काम युध्दपातळीवर सुरु असून युएसवरुन साहित्य मागवण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव जिल्हाप्रशासनाकडे पाठवला आहे. त्या तारांगणात 40 मिनीटांचा शो दाखवण्यात येणार आहे. त्यात पहिल्या दहा मिनिटात रत्नागिरी शहर, परिसर आणि कोकणातील माहिती दाखवण्यात येणार आहे. उर्वरित 30 मिनिटात तारांगण आणि वैज्ञानिक चलतचित्रे थ्रीडी स्वरुपात दाखवली जातील. कोरोनातील टाळेबंदीचा अडथळा असून परेदशातून येणार्‍या साहित्यावर त्याची सुरवात अवलंबून आहे; परंतु पुढील वर्षात तारांगण सुरु होईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.