नियोजित राज्य नाट्यस्पर्धा घेण्यावर कलाकार ठाम

दाभोळ:- दापोली तालुक्यातून राज्य नाट्य स्पर्धेला उतरलेल्या नाट्य कलावंतांसमोर कोविडचे निर्बंधे वाढू लागल्याने स्पर्धा होईल कि नाही याबाबत अनेक प्रश्न पिंगा घालू लागले आहेत. दापोली तालुक्याच्या हौशी रंगभूमीवरील घेतलेल्या ढांडोळ्यात हे उघड झाले. शासनाने राज्य नाट्य स्पर्धा रद्द करू नयेत अशी मागणी कलाकारांची आहे.

दापोली तालुक्याला हौशी रंगभूमीची खूप जुनी परंपरा आहे. तालुक्यातील गिम्हवणे, करजगाव ,मुरूड, कोळथरे ,आंजर्ले ,केळशी अशा अनेक गावांमध्ये उत्सवांच्या निमित्ताने प्रती वर्षी गद्यासोबत संगीत नाटकांचेही सादरीकरण मोठ्या उत्साहाने केले जात होते. मात्र ही सारी सांस्कृतिक परपंरा खंडीत झाली होती. बंधने शिथील झाल्यानंतर दापोली तालुक्यातील हौशी कलामंचात पुन्हा उत्साह संचारला आणि गावोगावी तीन अंकी,दोन अंकी नाटकांचे आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सुरू झाले. मात्र पुन्हा सांस्कृतिक कार्यक्रमांवर ५० लोकांच्या उपस्थितीचे बंधन आल्यावर या हौशी कलाकार मंडळींचा हिरमोड झाला आहे.      

दापोलीतीलच राज्य नाट्यस्पर्धेला उतरलेल्या निर्माते आणि लेखक ,दिग्दर्शक विलास कर्वे यानी शासनाने राज्य नाट्य स्पर्धा रद्द करू नयेत अशी विनंतीवजा मागणी केली आहे.ते म्हणाले आज सांस्कृतिक संचलनालयाकडे संपर्क केला असता राज्य नाट्य स्पर्धे बाबत कोणताही निर्णय शासनाने घेतला नसल्याची माहिती दिली. आमच्या सर्व कलाकार व सहका-यांच्या दोन्ही लसीचे डोस पूर्ण झालेत. स्पर्धा उशिरा जाहीर झाल्याने कमी कालावधीत जास्त मेहनत आम्ही घेत आहोत. मेहनतीवर पाणी पडणार नाही याची काळजी जशी आम्ही घेतोय तशी शासनाने घ्यावी. एकंदरीतच काही दिवसापूर्वी बहरलेली रंगभूमी पुन्हा पडद्याआड जाऊ नये. सर्व नियमांचे आम्ही कठोर पालन करू पण राज्य नाट्य स्पर्धा घ्याव्यातच अशी भूमिका नाट्यकलाप्रेमींनी व्यक्त केली आहे.