नियुक्ती आदेशास विलंब होत असल्याने उमेदवारांचा आत्मदहनाचा इशारा

रत्नागिरी:- सार्वजनिक आरोग्य विभागातील आरोग्य सेवक 50 टक्के पदभरतीतील सरळसेवा परीक्षा पात्र उमेदवारांना नियुत्ती आदेश मिळण्यास विलंब होत असल्याने पात्र उमेदवारांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या उमेदवारांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

कोव्हिड19 काळात मनुष्यबळ कमी असल्याने राज्य  शासनाने आरोग्य सेवेत तत्काळ भरती करण्याचे निर्देश दिले होते. यासाठी दि.28 फेब्रुवारी 2021 रोजी आरोग्य सेवक 50 टक्के व 40 या पदासाठी सरळसेवा परीक्षा घेण्यात आली होती. यामधील 40 टक्के मधील आरोग्य सेवक भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र बोगस प्रमाणपत्रधारकामुळे 50% भरती प्रक्रिया रखडली आहे.

या परीक्षेचा निकाल लागून सुमारे 9 महिने उलटून गेले असून यातील पात्र उमेदवारांचे समुपदेशन देखील घेण्यात आले आहे. या समुपदेशन काळात बरेच बोगस प्रमाणपत्रधारक उमेदवार मिळाल्याने त्यांना अपात्र करण्यात आले. परंतु पुणे जिल्हा हिवताप कार्यालयाकडून काही उमेदवारांना अपूर्ण कागदपत्रे असताना देखील पात्र म्हणून पडताळणी पाठविली जात आहे. यामुळे या भरती प्रक्रियेला विलंब होत आहे. याबाबत वारंवार तक्रार करून देखील दखल घेतली जात नाही.  

जिल्हा हिवताप कार्यालयातील उमेदवारांना मा. सहसंचालक (हिवताप ) पुणे यांच्या भरती प्रक्रियेबाबत परिपत्रकानुसार 1 ते 9 कागदपत्रे आवश्यक आहेत. तसेच पुणे जिल्हा हिवताप कार्यालयात मोठ्या प्रमाणात बोगस प्रमाणपत्र उमेदवार असल्याचे निदर्शनास आल्यानंतर  संचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग पुणे यांनी 12 जानेवारी 2022 रोजी या भरतीबाबत 1 ते 22 कागदपत्रांचे नवीन परिपत्रक जारी केले व त्यानुसार पदभरती करण्याचे आदेश दिले. तरी देखील संचालक यांचे आदेश न जुमानता अपूर्ण कागदपत्रांच्या आधारे पुणे जिल्हा हिवताप अधिकारी उमेदवारांना पात्र ठरवत आहेत.

1 ते 22 कागदपत्रे बंधनकारक असताना देखील अपूर्ण कागदपत्रांच्या आधारे जिल्हा हिवताप अधिकारी, पुणे हे वरिष्ठांचे आदेश पायदळी तुडवून अपूर्ण कागदपत्रे असताना उमेदवार पात्र म्हणून पडताळणी पाठवित आहेत, असा आरोप उमेदवार करत आहेत. त्यामुळे  प्रामाणिकपणे काम करणार्‍या 1998 पासूनच्या पात्र उमेदवारांवर अन्याय होत आहे. याबाबत 12 जानेवारी 2022 च्या पत्रानुसार सहायक संचालक तथा अध्यक्ष निवड समिती यांना निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
असे अधिकार असताना देखील ठोस निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणार्‍या उमेदवारांवर अन्याय होत आहे. सरळसेवा परीक्षा पास होऊन देखील पदभरतीला विलंब होत आहे. त्यामुळे भरती प्रकिया होईल की नाही या चितेंत पात्र उमेदवार आहेत. या आठवड्याभरात योग्य तो निर्णय न झाल्यास पुन्हा आत्मदहनासारखा टोकाचा निर्णय घेण्याच्या मनस्थितीत रत्नागिरीतील पात्र उमेदवार आहेत.