रत्नागिरी:- खारभूमी विकास विभागाकडून जिल्ह्यात बांधण्यात येणार्या हर्चे, सोमेश्वर, केळ्ये येथील बंधार्यांची कामे रखडण्याची शक्यता आहे. शासनाकडून निधी कपातीचे धोरण स्विकारल्यामुळे पुढील आदेशापर्यंत या कामांच्या निविदा प्रक्रिया राबविता येणार नसल्याचे खारभूमी विभागाकडून जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत सांगण्यात आले.
खारभुमी विभागाकडून मंजुर झालेल्या बंधार्यांच्या कामाचा आढावा सादर करण्याची मागणी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेमध्ये सदस्यांनी केली होती. याबाबत लेखी उत्तर संबंधित विभागाकडून देण्यात आले. त्यामध्ये कामाची आजची परिस्थिती काय आहे हे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामध्ये हर्चे येथील बंधारा दुरुस्तीची निविदा दोनवेळा प्रसिध्द करण्यात आली. तथापी त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. शासनाच्या आदेशानुसार पुढील आदेशान्वये कोणत्याही प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता, निविदा व कार्यारंभ आदेश देऊ नयेत असे सुचित केले आहे. कामाची गरज लक्षात घेऊन मंडळा कार्यालयाच्या सुचनेनुसार निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मंजूरी मिळण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.
बृहत आराखड्यानुसार सोमेश्वर नावाची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. या योजनेचे सविस्तर सर्वेक्षण केल्यानंतर अंदाजपत्रक सादर करणे शक्य होईल. त्या सर्वेक्षणाचे काम 2020-21 या आर्थिक वर्षात समाविष्ट केले आहे. त्यानुसार सविस्तर सर्वेक्षणाचे अंदाजपत्रक मंडळ कार्यालयात 18 नोव्हेंबर 2020 ला सादर केले आहे. 33 टक्के अनुदानाच्या मर्यादेत प्रत्यक्ष खर्च करता येणार असल्याने हे कामही थांबलेले आहे. केळ्ये येथील बंधारा योजनेचे एक काम प्रगतीपथावर आहे. उर्वरित कामाची निविदा दोनदा प्रसिध्द करण्यात आली आहे. त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. ते कामही रखडलेले होते; परंतु गरज लक्षात घेऊन मंजूरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती खारभुमी कार्यालयाकडून जिल्हा परिषदेला कळविण्यात आले आहे.