रत्नागिरी:- इयत्ता दहावीचा निकाल सर्वांत लवकर लागूनही अनेक प्रकारच्या तांत्रिक अडचणीत सापडलेली अकरावी प्रवेशप्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. त्यामुळे तीन महिन्यानंतर अकरावीचे वर्ग सुरू झाले आहेत. आतापर्यंत प्रवेशाच्या पाच फेऱ्या पूर्ण झाल्या असून, शेवटची फेरी १९ ऑगस्टला होणार आहे. जिल्ह्यात ८७.७३ टक्के विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आहे.
दहावीचा निकाल लागून जवळपास तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला. अकरावी प्रवेशासाठी जिल्ह्यातून १६ हजार १७१ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली होती. एकूण पाच विविध फेऱ्यानंतर १४ हजार ९८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यातही विद्यार्थ्यांचा विज्ञान शाखेकडे सर्वाधिक ओढा असून, त्या पाठोपाठ वाणिज्य शाखेकडे कल आहे.
दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यात १७ हजार ७५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. दहावीचा निकाल १३ मे रोजी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. मात्र, यावर्षी अकरावी प्रवेशप्रक्रिया प्रथमच सर्वत्र ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात आल्याने तीन महिने रखडली.
जिल्ह्यात विज्ञान शाखेची २० कनिष्ठ महाविद्यालये आहेत. एकूण जागा आठ हजार आहेत. प्रत्यक्ष ५,२७२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. पीसीएम व पीसीबी ग्रुपसाठी प्रवेश घेऊन अभियांत्रिकी, वैद्यकीय शाखेकडे प्रवेश घेण्याचा ओढा अधिक असल्यामुळे विज्ञान शाखेतील प्रवेश सर्वाधिक झाले आहेत. आता शेवटची एक विशेष फेरी १९ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामध्ये आणखी विर्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. जिल्ह्यात कला शाखेची ११४ महाविद्यालये असून ७,६२० जागा असून, प्रत्यक्ष प्रवेश ३,१९१ एवढे झाले आहेत.
वाणिज्य शाखा दुसऱ्या क्रमांकावर
जिल्ह्यात वाणिज्य शाखेची १३२ महाविद्यालये असून, एकूण जागा ८५२० आहेत. प्रत्यक्ष प्रवेश ५,१५२ विद्यार्थ्यांनी घेतला आहे. बॅंकिंग, सीए, सहकार क्षेत्राची आवड असलेल्या विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेसाठी प्रवेश घेतला आहे.