जिल्हास्तरीय मुलाखतीला ९० पात्र; अंतिम परीक्षा २० ला
रत्नागिरी:- अंतराळावर अभ्यास करणार्या नासा, इस्रो या संस्थांच्या भेटीसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून राबवण्यात आलेली विद्यार्थी निवड अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्हास्तरावरील परीक्षेसाठी ९० विद्यार्थी पात्र ठरले असून २० डिसेंबरला ३६ मुले निवडली जाणार आहेत. ही परीक्षा इन कॅमेरा घेण्यात येणार आहे. मुलाखतीसाठी विज्ञानातील तज्ज्ञ १५ अध्यापकांची नियुक्ती जिल्हा परिषदेने केली आहे.
ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांमधून संशोधक, शास्त्रज्ञ निर्माण व्हावेत या उद्देशाने रत्नागिरी जिल्हा परिषदेने नासा, इस्रो भेटीचा उपक्रम राबवला आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार, अतिरिक्त सीईओ परिक्षित यादव, शिक्षणाधिकारी वामन जगदाळे यांच्यासह संदीप कडव, मुरकुटे यांच्यासह अन्य अधिकार्यांनी विद्यार्थी निवडीचे नियोजन केले. यामध्ये केंद्रस्तरावर झालेल्या परीक्षेसाठी २३ हजाराहून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यामधून बीटस्तरासाठी २६०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्या परीक्षेतून तालुकास्तरासाठी ५६० विद्यार्थी पात्र ठरले. तालुकास्तरावर झालेल्या परीक्षेतून जिल्हास्तरासाठी ९० विद्यार्थी निवडण्यात आले आहेत. मुलाखत स्वरूपात होणारी निवड परीक्षा २० डिसेंबरला जिल्हा परिषदेत ठेवण्यात आली आहे. ही चाचणी घेण्यासाठी विज्ञान विषयातील 15 तज्ज्ञ अध्यापक नियुक्त केले आहेत. त्यांची पाच पथके तयार केली असून, ते नासासाठी ९ तर इस्रोसाठी २७ विद्यार्थी निवडतील. यामध्ये विद्यार्थिनींचाही समावेश आहे. एका पथकात 3 तज्ज्ञांचा समावेश केला असून, पारदर्शकतेसाठी या प्रकियेचे व्हिडिओ शूटिंग केले जाणार आहे.
मुलाखतीचे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे. १०० गुणांची परीक्षा घेतली जाईल. मुलाखतीत ५० गुणांचे विज्ञान विषयावरील 16 प्रश्न विचारले जाणार आहेत. सादरीकरणासाठी २५ गुण असून प्रत्येक विद्यार्थ्यांना परीक्षक एक विषय देतील. त्यावर स्वतःहून आपले मत व्यक्त करावयाचे आहे. तिसरा टप्पा प्रात्यक्षिकाचा असून त्यासाठी २५ गुण ठेवले आहेत. यामध्ये छोटे प्रयोग विद्यार्थ्यांना करावे लागणार आहेत. परीक्षकांकडून चांगला, उत्तम, अतिउत्तम असा शेरा दिला जाणार आहे. एका विद्यार्थ्यासाठी किमान पंधरा ते वीस मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. त्यासाठी परीक्षकांची पाच पथके बनवलेली असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. परीक्षा झाल्यानंतर लगेचच निवडलेल्या विद्यार्थ्यांची नावे जाहीर केले जाणार आहेत. दरम्यान, अमेरिकेन अॅम्बिसिकडून व्हिसासाठीची परवानगी प्राप्त झाली की नासा भेटीसंदर्भातील तारखा निश्चित केल्या जाणार आहेत. तोपर्यंत विद्यार्थी निवड प्रक्रिया पूर्ण करून घेण्यात येणार आहे.