रत्नागिरी:- अंतराळाचा अभ्यास करणार्या नासा, इस्त्रोसारख्या संस्थांना भेटी देण्याचा उपक्रम रत्नागिरी जिल्हापरिषदेकडून हाती घेण्यात आला असून त्याला जिल्हा नियोजनमधून ७० लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. यासाठी जिल्हापरिषदेच्या २५१ केंद्रातील पावणेतीन हजार शाळांमधील २७ हजार विद्यार्थ्यांची ३० नोव्हेंबरला चाळणी परिक्षा घेण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषद शाळांमधून अनेक विद्यार्थी स्पर्धा परिक्षांमधून अव्वल दर्जाचे अधिकारी घडत आहेत. ग्रामीण भागातील काही विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासक, वैज्ञानिक किंवा संशोधक घडण्याची क्षमता असते. अशा विद्यार्थ्यांना शोधून काढून त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षण विभागाने नासा, इस्त्रो सारख्या संशोधन संस्था विद्यार्थ्यांना पाहता याव्यात यासाठी कार्यक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमासाठी अभ्यासू विद्यार्थी निवडले जाणार आहेत. केंद्र, बीट, तालुका आणि जिल्हा अशा चार स्तरावर परिक्षा घेऊन त्यामधून नासासाठी नऊ तर इस्त्रोसाठी २७ विद्यार्थी निवडले जातील. यामध्ये विद्यार्थींनींचाही समावेश असेल. यासंदर्भात ११ नोव्हेंबरला मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, शिक्षणाधिकारी वामन जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरावर प्रशिक्षण घेण्यात आले. ३० नोव्हेंबरला केंद्रस्तरावर चाळणी परिक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये ५ ते ८ वी पर्यंतचे २७ हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यामधून बीटस्तरावरील परिक्षेसाठी २ हजार ५१० विद्यार्थी निवडले जातील. तालुकास्तरावरील परिक्षेसाठी ५५० विद्यार्थी निवडण्यात येणार असून यामधून जिल्हास्तरीय परिक्षेसाठी ९० जणांना संधी मिळेल. अंतिम परिक्षा घेतल्यानंतर २७ विद्यार्थी नासाला तर इस्त्रोसाठी ९ जणांना संधी दिली जाईल. शेवटच्या निवडीसाठी मुलाखत आणि प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना विषय दिला जाणार असून त्यावर भाष्य करावयाचे आहे. या परिक्षेसंदर्भात माहिती देताना उपशिक्षणाधिकारी एस. जे. मुरकुटे म्हणाल, परिक्षा या विज्ञानावर आधारित घेतल्या जातील.
जीवशास्त्र, भौतीकशास्त्र आणि रसायनशास्त्रावर आधारीत वस्तुनिष्ट आणि बहूपर्यायी अशा शंभर मार्काची प्रश्नावली विद्यार्थ्यांना सोडविण्यास देण्यात येणार आहे. त्यात अव्वल आलेल्यांना पुढे संधी मिळत जाईल. या परिक्षेच्या माध्यमातून विज्ञान विषयाची उजळणी होणार आहे.