नावेद-2 नौकेच्या शोधासाठी चार दिवसात सर्च ऑपरेशन

रत्नागिरी:- समुद्राच्या तळाशी रूतलेल्या जयगड येथील नावेद 2 नौकेचा शोध घेण्यासाठी स्थानिक मच्छीमारांनी स्कुबा डायव्हर्सची मदत घेतली होती. आता पोलीस दलाकडूनही तारकर्ली येथील स्कुबा डायव्हर्स्ना बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या चार दिवसात पथक जयगड येथे प्रत्यक्ष ऑपरेशन करणार आहेत. याला उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी दुजोरा दिला.

जयगड येथील नावेद मच्छीमारी नौका नोव्हेंबर महिन्यात बेपत्ता झाली होती. त्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक मच्छीमार प्रचंड आक्रमक झालेेले होते. पोलिस यंत्रणांसह, मेरीटाईम बोर्ड, तटरक्षक दलाकडून समुद्र तळातील शोध मोहीम घेण्यात दिरंगाई केली होती. मागील आठवड्यात स्थानिक मच्छीमारांनी नावेदच्या शोध घेण्यासाठी खासगी स्कुबा डायर्व्हस्ची मदत घेतली होती. त्यात समुद्राच्या तळाशी नावेदचे अवशेष असल्याचा दावा त्या खासगी स्कुबा डायर्व्हस्नी केला होता. त्यानंतर प्रशासनाकडूनही त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी पावले उचलली आहेत. तारकर्ली येथील स्कुबा डायर्व्हस्च्या पथकाला पोलिस प्रशासनाकडून पत्र देण्यात आले होते. पथकाकडून मोहीम राबविण्याची तयारी दर्शविली आहे. येत्या चार ते पथक जयगड येथे दाखल होईल.
खासगी बंदरात येणार्‍या फतेहगड या मालवाहू जहाजाने धडक दिल्याचा संशय असून पोलिस त्याचा तपास करत आहेत. जयगड किनार्‍यापासून दोन नॉटीकल मैल समुद्रात एक संशयास्पद वस्तू जहाजाच्या दिशेने आल्याचा संदेश फतेहगड मालवाहू जहाजाकडून आला होता. त्यावरुन नावेद नौकेला अपघात झाल्याचा अंदाज बांधला जात आहे. या प्रकरणी फतेहगड जहाजावर गुन्हा दाखल आहे. आता पोलिसांनीही समुद्रात तळाशी रूतलेल्या नावेदची पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच फतेहगड मालवाहू जहाज बंदरात बोलावावे, अशी नोटीस पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे. ते जहाज येत्या चार दिवसात जयगडला दाखल होण्याची शक्यता आहे.