रत्नागिरी:- जयगड समुद्रात बुडालेल्या नावेद-२ या मच्छीमार नौकेचा शोध लागलेला नाही. मच्छीमार तीव्र नाराज असून आंदोलनाच्या तयारीत आहेत. या संदर्भात जयगड येथे शुक्रवारी (ता. १९) मच्छीमारांची बैठक होणार आहे. पोलिसांनी नावेदला मालवाहतूक जहाजाकडून अपघात झाला आहे का या दृष्टीने तपासाची दिशा ठेवली आहे. मालवाहतूक जहाजाच्या कप्तानाची चौकशी सुरू असून त्यांनीही जहाजाजवळ तरंगती वस्तू दिसल्याची माहिती दिल्याचे पुढे आले आहे.
नावेद-२ नौका बेपत्ता होऊन आतापर्यंत पंचवीस दिवस उलटले आहेत. मालवाहू जहाजाने नौकेला धडक दिली असल्याची शक्यता मच्छीमारांनी व्यक्त केली आहे. २२ नॉटिकल मैल खोल समुद्रात नावेद नौकेवरील एका खलाशाचा मृतदेह सापडला तर एक मृतदेह गस्ती नौकेला किनार्यावर आणता आला नाही. नौकेचा भाग किंवा त्यावरील साहित्यापैकी एक मासळी ठेवायचा टब सोडल्यास एकही वस्तू सापडलेली नाही. त्यामुळे नावेदचे नक्की काय झाले याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे; परंतु मच्छीमारांमध्ये अपघात झाल्याच्या शक्यतेवरच ठाम मत व्यक्त केले जात आहे. जयगड येथील त्या खासगी कंपनीच्या बंदराकडे मालवाहतूक जहाजे येण्यासाठी मेरीटाईम बोर्डाने चॅनल तयार करून दिला आहे. अनेक मोठी जहाजे अंतर कमी करण्यासाठी चॅनलच्या बाहेरून येत असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे नावेदला अपघात झाला असावा, असाही संशय व्यक्त केला जात आहे. या मुद्द्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी मच्छीमार करत आहेत.
बेपत्ता नौकेचा शोध घेण्यात यश येत नसल्याने मच्छीमार संतप्त झाले असून, आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीला लागले आहेत. शुक्रवारी जयगड येथे मच्छीमारांची बैठक होणार आहे. त्यामध्ये पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. मालवाहू जहाजे येणार्या चॅनेलवर मच्छीमारी बोटी उभ्या करून समुद्रात आंदोलन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आवाहनही करण्यात आले आहे. यामध्ये नक्की कोणता निर्णय घेतला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही बैठक सकाळी १० वाजता जयगड मच्छीमार संस्थेच्या कार्यालयाजवळ होणार आहे. नौकेला अपघात झाल्याच्या दिशेने पोलिसांची तपास यंत्रणा काम करत आहे. यामध्ये एका मालवाहू जहाजाच्या कप्तानाला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. बंदरावर दिलेल्या संदेशानुसार, दोन नॉटिकल मैल अंतरावर समुद्रात एक तरंगती वस्तू जहाजाच्या दिशेने आल्याची माहिती त्या कप्तानाने दिल्याचे समजते. कप्तानाकडून मिळालेली माहिती तपासून पाहण्यासाठी जहाजावरील अन्य कर्मचार्यांकडे पोलिस चौकशी करणार आहेत. त्यानंतरच त्या दिवशी समुद्रात काय झाले, यावर शिक्कामोर्तब होणार आहे.