‘नावेद २’ बोटीचा अपघात की अपहरण?

ना. सामंत यांचे सखोल चौकशीचे आदेश

रत्नागिरी:- ‘नावेद २’ या जयगड बंदरातून बेपत्ता झालेल्या नौकेचा अद्याप शोध लागलेला नाही. केवळ एका खलाश्याचा मृतदेह आढळून आला आहे. तर दुसर्‍या मृतदेहाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र अद्याप नौकेचे काय झाले? त्यावरील खलाशी कुठे आहेत याचा शोध घेत प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश तपास यंत्रणांना देण्यात आले आहे. बोटीचा अपघात झाला कि अपहरण याचाही तपास करण्याची आवश्यकता आहे. तटरक्षक दलाला पुन्हा ‘सर्च ऑपरेशन’ राबविण्याची सुचना केल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 

जिल्हाधिकारी कार्यालय  त्यांनी स्थानिकांकडून माहिती जाणून घेतली, जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील तसेच पोलीस दल आणि कोस्ट गार्ड तसेच मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
         

जयगड  लगतच्या गावातील मच्छीमारांनी ‘नावेद२’ नौका मालवाहू जहाजामुळे बुडाल्याची तक्रार केली आहे. मात्र बोटीचे कोणतेही अवशेष आणि त्यावरील खलाशांचे मृतदेह अद्याप हाती लागलेले नाहीत.  घटना दि.२६ ऑक्टोबरच्या रात्री घडली होती. नौका भरकटली असावी असे समजून या बोटीच्या मालकाने प्रारंभी शोघ घेण्याचा प्रयत्न केला.मात्र अपयश आल्याने ७२ तासांनी यात पोलिसात तक्रार करण्यात आली. त्यानंतर  पोलिस आणि कोस्टगार्ड आपापल्या पध्दतीने यासाठी शोधमोहिम राबविली मात्र अद्यापही यात काहीच सापडलेले नाही. याबाबत नव्याने शोधमोहिम राबवावी तसेच यात अपहरणाचा प्रकार तर नाही ना याचाही तपास करण्याचे निर्देश ना.सामंत यांनी दिले आहेत.

ज्या भागात एका खलाशाचा मृतदेह आढळला. त्या भागात नौकेचे काही तरी अवशेष आढळणे आवश्यक होते. दोनवेळा सर्च ऑपरेशन करुनही काहीच आढळत नसल्याने अनेक शंका तपास यंत्रणांनाही पडल्या आहे. त्यामुळे सखोल तपास करुन अंतिम निष्कर्ष काढणे आवश्यक असल्याचे मत ना.सामंत यांनी व्यक्त केले.