तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा; युवासेेनेचे आयोजन
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुका युवासेनेने आयोजित केलेल्या ‘नामदार चषक’ तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद रत्नदिप संघाने पटकावले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात भराडीनी संघावर अवघ्या तीन गुणांनी मात केली.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या नावाने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत बारा संघांनी सहभाग घेतला होता. युवासेनेचे तालुका युवाअधिकारी तुषार साळवी, शहर युवाधिकारी अभिजित दुडये यांच्या संकल्पनेतून आणि तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडली. यासाठी वैभव पाटील यांनी विशेष मेहनत घेतली होती. कुवारबाव येथील शिवसेना शाखेजवळील सुयोग सोसायटी मैदानावर याचे उद्घाटन उद्योजक रविंद्र उर्फ अण्णा सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेतील सामने चुरशीचे झाले. रत्नागिरीतील नामांकित संघांतील खेळाडूंनी दर्जेदार खेळाचे प्रदर्शन केले. अंतिम सामना रत्नदिप विरुध्द भराडीनी यांच्यात झाला. मध्यंतराला समांतर गुण होते. शेवटच्या पाच मिनिटापर्यंत सामन्याचे चित्र स्पष्ट झाले नव्हते. रत्नदिपच्या परेश पाटील यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजयात मोलाची कामगिरी बजावली. हा सामना तिन गुणांनी रत्नदीपने जिंकली. भराडीनीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेतील विजेत्या संघाला भव्य चषक आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. चांगला खेळ करणार्या खेळाडूंनाही वैयक्तिक पारितोषीक देऊन गौरविण्यात आले. त्यात उत्कृष्ट पकड श्रेयस बारगोडे (भराडीन), उत्कृष्ट चढाई परेश पाटील, अष्टपैलु खेळाडू रोहित गोरीवले (दोन्ही रत्नदिप) यांचा समावेश आहे. त्यांचाही गौरव करण्यात आला. याप्रसंगी तालुकायुवाधिकारी तुषार साळवी म्हणाले की, तालुक्यातील दर्जेदार कबड्डीपटूंचा खेळ रत्नागिरीकरांना पहावयास मिळावा आणि खेळाडूंना जास्तीत जास्त स्पर्धा खेळण्याची संधी मिळावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये युवासेना यशस्वी ठरली आहे. रत्नागिरीकरांचा याला उत्स्फुर्त प्रतिसादही लाभला आहे.









