रत्नागिरी:- पुढील वर्गात प्रवेश देण्याच्या निर्णयाचा पहिली ते आठवीच्या रत्नागिरी जिल्ह्यातील 40 हजार 306 विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. कोरोनाचा कहर वाढत असल्यामुळे शिक्षण विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे; मात्र पालकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
गेल्या वर्षी परीक्षेच्या सुमारास सुरू झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव यंदाही परीक्षांच्या तोंडावर बळावला. त्यामुळे पुन्हा परीक्षांबाबत शिक्षण विभागासमोर पेच निर्माण झाला. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून त्यांना सरसकट पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय विभागाने नुकताच जाहीर केला. त्यानंतर नववी आणि अकरावीच्या वर्गांबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. बहूतांश काळातील शिक्षण हे यंदा ऑनलाइन सुरु होते. नोव्हेंबरनंतर शाळेत जाऊन प्रत्यक्ष अध्यापनाला आरंभ झाला. बहुतेक ठिकाणी प्रात्यक्षिके, सत्र परीक्षा, चाचणी परीक्षा झालेल्या नाहीत. अकरावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे, असा पेच शिक्षण विभागासमोर होता. तो पेच विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याच्या निर्णयामुळे सुटला आहे. नववी, अकरावी दोन्ही वर्गातील जिल्ह्यात नववीच्या 432 शाळा असून 22 हजार 579 तर अकरावीमध्ये 152 कनिष्ठ महाविद्यालयात 17 हजार 726 विद्यार्थी शिक्षण घेत होते. शासनाने पुढील वर्गात प्रवेश दिल्याचा या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
विद्यार्थ्यांना कोरोनामुक्त ठेवण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. परिस्थिती पाहता ते योग्य असले तरीही शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकते. भविष्यात बोर्डाच्या परिक्षांसाठी गुणवत्ता वाढीवर शाळा, शिक्षक आणि पालकांना भर द्यावा लागणार आहे.