खेड:- खेड तालुक्यात नातूनगर येथे रविवारी मध्यरात्री सुमारे तीन वाजता मर्सिडीज बेंझ कारला अचानक आग लागली. ही आग खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या तत्परतेने विझवण्यात आली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक येथील संदेश राजेश चवळे हे आपल्या मालकीची MH 02 BZ 1400 क्रमांकाची मर्सिडीज बेंझ कार घेऊन नाशिक ते गणपतीपुळे असा प्रवास करीत होते. या मार्गावर प्रवास करत असताना त्यांनी गुगल मॅपचा आधार घेतला होता. यानुसार त्यांची गाडी ही महामार्गावरून प्रवास करताना महामार्गाला पर्याय असणाऱ्या विन्हेरे. अंगावरून येत होती. यावेळी गाडीतून एकूण तिघे जण प्रवास करीत होते. मात्र या मार्गावर प्रवास करताना अचानक त्यांच्या गाडीने पेट घेतला आणि आग लागली. यावेळी गाडीतून प्रवास करणारे तिघेजण वेळीच बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या घटनेची माहिती मिळताच खेड नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. फायरमन श्याम देवळेकर, दिपक देवळेकर, वाहनचालक गजानन जाधव, सहायक फायरमन जयेश पवार आणि प्रणय रसाळ यांनी धाडसाने आणि कौशल्याने काल लागलेली आग विजवली. मात्र या आगीमुळे कार पूर्णपणे जळून खाक झाली असून नेमकी ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.