रत्नागिरी:- सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव वर्ष स्वागताचा जल्लोष करण्यासाठी मुंबई, पुण्यातील पर्यटकांनी रत्नागिरी जिल्ह्यातील किनारी पर्यटनाबरोबर येथील पर्यटन स्थळांना पहिली पसंती दिली आहे. सरत्या वर्षात शनिवार, रविवार सुट्टी असल्याने तसेच नाताळ, थर्टीफर्स्टनिमित्त येथील हॉटेल, लॉज आता शंभर टक्के हाऊसफुल्ल झाले आहेत.
ख्रिसमस आणि नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्याची प्रत्येकाची इच्छा आहे. खर्चाच्या दृष्टेीने प्रत्येकाला हे परवडत नसल्यामुळे काहीजण गुहागर, दापोलीसह रत्नागिरी, गणपतीपुळे, पावस, मार्लेश्वरसह जिल्ह्यातील बजेटमध्ये बसणार्या सहलींचे नियोजन करत आहेत. आंबा, काजू, नारळ, पोफळीच्या बागा आणि अथांग पसरलेले समुद्रकिनारे ही रत्नागिरी जिल्ह्याची विशेष ओळख आहे. त्यात ताज्या मासळीच्या लज्जतदार जेवणामुळे अनेकजण रत्नागिरीसह गुहागर, दापोली, मंडणगडसारख्या पर्यटनस्थळांची वाट धरतात. रात्री उशिरापर्यंत जल्लोष साजरा करणे, असे अनेकांनी नियोजन केले आहे. यावर्षी वर्षअखेर रविवारी असून सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी अनेक ठिकाणी सुरू आहे.