नाणीज येथे भरधाव कारच्या धडकेत दोन तरुण जखमी

रत्नागिरी:- कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर नाणीज जुनामठ येथे रविवारी रात्री एका भरधाव कारने दिलेल्या धडकेत दोन तरुण जखमी झाले आहेत. अपघाताच्या ठिकाणी असलेल्या गर्दीचा विचार न करता वाहन अतिवेगात चालवल्याने हा अपघात घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २६) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास नाणीज जुनामठ परिसरात एका अपघात स्थळी लोकांची गर्दी जमली होती. याच दरम्यान कोल्हापूरकडून रत्नागिरीच्या दिशेने जाणारी स्विफ्ट कार (क्र. MH 08 R 1017) तेथून जात होती. कार चालक वसीम अब्दुल रहेमान (रा. राजिवडा, रत्नागिरी) याने रस्त्यावरील गर्दीकडे दुर्लक्ष करून गाडी अतिवेगात आणि निष्काळजीपणे चालवली.
​या भरधाव कारने तिथे उभ्या असलेल्या दोन तरुणांना जोरदार धडक दिली. या अपघातात करण बाळकृष्ण शिवगण (वय २५, रा. नाणीज शिवगणवाडी, रत्नागिरी) हा गंभीर जखमी झाला असून प्रथमेश विनोद बेंद्रे (वय २४, रा. मिरजोळे हनुमाननगर, रत्नागिरी) हा किरकोळ जखमी झाला आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

​या प्रकरणी नाणीज गावचे पोलीस पाटील नितीन रामा कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून कार चालक वसीम अब्दुल रहेमान याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत.