नाणीज येथे कार-ट्रक अपघातात एकजण ठार

रत्नागिरी:- गणपतीपुळे येथून पुण्याकडे निघालेल्या पर्यटकांच्या कारला रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर नाणीज इरमलवाडी येथे झालेल्या अपघातात कारमधील १ जण ठार झाल्याची घटना गुरूवारी रात्री ८ वा.च्या सुमारास घडली. कैवल्य अनिल कुलकर्णी (३७, रा. बावधन, पुणे) असे अपघात मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे तर कारचालक संजय जयकुमार तांबोळी (३९, रा.पिंपरी, पुणे) हे जखमी झाले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय तांबोळी हे आपल्या ताब्यातील कार क्र. एमएच १२ एसई ७६१८ हे घेऊन गणपतीपुळे तेे कोल्हापूर असे जात होते. त्यांची गाडी नाणीज इरमलवाडी येथे आली असता समोरून येणाऱ्या ट्रकला त्यांच्या कारची जोरदार धडक बसली. 

समोरासमोर ठोकर होऊन झालेल्या अपघातात कारमधील कैवल्य कुलकर्णी यांना गंभीर दुखापत झाली. तर संजय तांबोळी हेदेखील जखमी झाले होते. गंभीर जखमी झालेल्या कैवल्य कुलकर्णी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताची नोंद ग्रामीण पोलीस स्थानकात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.