नाणिज बस थांबा येथील भुयारी मार्गाचा प्रश्न सुटल्याने आंदोलन मागे

प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या उपस्थितीत कामाला सुरुवात

रत्नागिरी:- मिर्‍या-नागपूर महामार्गावरील नाणिज गाव बसथांबा येथे भुयारी मार्ग मिळावा यासाठी नाणिज, शिरंबली, चोरवणे ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश आले आहे.  प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या उपस्थितीतच कामाला सुरुवात झाल्याने येथील रास्तारोको आंदोलन मागे घेण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. या कामासाठी ज्यांनीज्यांनी ग्रामस्थांना सहकार्य केले त्या सर्वांचेच शनिवारी ग्रामपंचायतीमध्ये आयोजित बैठकीत आभार मानण्यात आले.

नाणिज बाजारपेठ ही लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर तालुक्याचा केंद्रबिंदू आहे. नाणिज पंचक्रोशीतील गावाचा हा बसथांबा 70 वर्ष जुना आहे. याठिकाणी महामार्गाचा भराव टाकला जात असल्यामुळे शेतकर्‍यांना शेतात जनावरे व अवजारे घेऊन जाण्यासाठीही जवळपास 800 मीटरचा वळसा मारावा लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर शेती सोडून देण्याची वेळ शासन आणणार आहे का असा प्रश्नही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. याच बसथांब्याजवळ ग्रामपंचायत, पोस्ट ऑफिस, तलाठी कार्यालय, पंचक्रोशी सोसायटी, बँका, दवाखाना, मेडीकल, किराणा व भाजी दुकाने असल्यामुळे आता ग्रामस्थांना मोठा त्रास होत आहे. छोट्या मुलांसाठीची जि.प. शाळाही जवळ असल्यामुळे मुलांनाही मोठा धोका आहे. त्यामुळे नाणिज बसथांब्याजवळ भुयारी मार्ग काढावा अशी मागणी ग्रामस्थांनी सुरु केली होती. याबाबत पालकमंत्री उदय सामंत, खासदार नारायण राणे, लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या भेटीही ग्रामस्थांनी घेत, भुयारी मार्गाच्या आवश्यकतेबाबत माहिती देऊन निवेदने दिली होती.

प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी शनिवारी नाणिज ग्रामपंचायतीमध्ये बैठक घेतली आणि त्यांना चार मीटर रुंदी व अडीच मीटर उंचीचा रिक्षा, रुग्णवाहिका व पादचारी जातील असा भुयारी मार्ग बांधून देण्याबाबत पालकमंत्री, खासदार व आमदार यांच्या सूचनानुसार मंजूर झाला असल्याचे सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांनी या सर्वांचे टाळ्या वाजवत स्वागत केले. नाणिज आंदोलन समितीचे अध्यक्ष वसंत रामा दरडी यांनी नाणिज, चोरवणे, शिरंबवली ग्रामस्थांसह या भुयारी मार्ग व्हावा म्हणून सहकार्य करणार्‍यांचे आभार मानले.


ग्रामस्थांनी केलेल्या आग्रहामुळे भुयारी मार्गाच्या कामाचे श्रीफळ वाढवून प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी शुभारंभ केला. पालकमंत्री, खासदार व आमदारांनी केलेल्या सूचनेप्रमाणे लवकरातलवकर व्हावे असेही ठेकेदाराच्या अधिकार्‍यांना सांगितले. ग्रामस्थांनी भुयारी मार्ग मंजूर झाल्यामुळे फटाक्यांची आतषबाजी करीत आनंद साजरा केला.