रत्नागिरी:- ग्रीन रिफायनरी प्रकल्प नाणार येथेच व्हावा यासाठी राजापूर येथील अनेकांकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यात फेडरेशन ऑफ असोसिएशन्स फॉर रत्नागिरी डेव्हलपमेंटची (एफएआरडी) भर पडली आहे. प्रकल्पासाठी 26 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
रत्नागिरी ग्रीन रिफायनरी या प्रकल्पाचे राजापूर येथील जागेतच पुनरुज्जीवन व्हावे, यासाठी संयमित आणि शांततापूर्ण प्रयत्न कोकण विकास मंडळ जनकल्याण प्रतिष्ठानकडून सुरु आहेत. जिल्ह्यातील खासदार, स्थानिक आमदार आणि सत्ताधारी पक्षाची प्रवृत्ती हम करे सो कायदा आहे. रिफायनरी प्रकल्पामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा चेहरामोहरा पालटू शकतो. जिल्ह्यातील बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचे स्वप्न या प्रकल्पातून पूर्ण होणार आहे. व्यवसाय उद्योगाअभावी मृतावस्थेत असलेल्या व्यावसायिकांना आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. हा प्रकल्प जिल्ह्यातून कायमस्वरुपी हद्दपार होऊ नये यासाठी फेडरेशन ऑफ असोसिएशन्स फॉर रत्नागिरी डेव्हलपमेंटने राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषणाचा निर्णय घेतला आहे. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाडा यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण होणार असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सुमारे 50 कार्यकर्ते यात सहभागी होतील. रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेकडून विरोध सुरु आहे. गेले काही दिवस स्थानिक पातळीवरुन रिफायनरी प्रकल्पाच्या बाजूने अनेकांनी पावले उचलली आहेत. त्या या संघटनेच्या उपोषणाची भर पडलेली आहे.









