खा. राऊत; पुन्हा उकरण्याची आवश्यकता नाही
रत्नागिरी:- नाणार रिफायनरी विषय संपलेला आहे, तो कोणीही पुन्हा उकरून काढू शकत नाही, ही शिवसेनेची स्पष्ट भूमिका असल्याचं खासदार विनायक राऊत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे, ते बुधवारी रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी बोलताना खा. राऊत म्हणाले की, जे शिवसैनिक दुर्दैवाने जमीनमालक असतील ते या प्रकल्पाची मागणी करत असतील तर त्यांना एवढं गांभीर्याने घेण्याची गरज नाही. दलाली जे करणारे असतील त्याच्यामध्ये दुर्दैवाने शिवसैनिक असतील त्या दलाली करणाऱ्यांंच्या आरडाओरडीकडे सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख बिलकूल लक्ष देणार नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीत सुद्धा स्पष्ट आहे की, रिफायनरी रद्द करावी ही स्थानिक जनतेची मागणी होती, जनतेच्या या मागणीनुसारच मुख्यमंत्र्यांनी रिफायनरीची नोटिफिकेशन रद्द केलेली आहे. जोपर्यंत स्थानिक जनता हा विषय मांडत नाही, तोपर्यंत हा विषय संपलेला आहे, हाच मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचा अर्थ होता असं खासदार विनायक राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात विघातक प्रकल्प केव्हाच येणार नसल्याचंही खासदार विनायक राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.