रत्नागिरी:- नाणार रिफायनरीचा विषय शिवसेनेने केव्हाच संपवला आहे आणि या प्रकल्पाबाबत भूमिका मांडण्याचा अधिकार केवळ पक्षप्रमुखाना असून यापुढे जिल्ह्यात नाणारबाबत कोणीही आपली भूमिका मांडू नये असा इशाराच शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी दिला आहे.त्यामुळे ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत आमदार विरुद्ध जिल्हाप्रमुख असा वाद शिवसेनेत पेटला आहे.
राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी नाणार रिफायनरीबाबत नुकतीच आपली भूमिका स्पष्ट केली.स्थानिकांना हा प्रकल्प हवा असल्याचे सांगून आ.राजन साळवी यांनी प्रकल्पावरून पुन्हा आपली भूमिका बदलून युटर्न घेतला आहे.आ.साळवी याच्या या वक्तव्यावरून शिवसेनेत काहूर माजले असून शिवसेनेतील अतर्गत संघर्ष चांगलाच पेटला आहे.
आ.साळवी यांनी केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी पत्रकार परिषद घेउन आ.साळवी यांच्या वक्तव्यावरून थेट तंबीच दिली आहे. शिवसेनेचा नाणारला विरोध असून नाणारचा विषय संपलेला आहे. आमदार राजन साळवी यांच्या वक्तव्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काहीही फरक पडणार नाही. आम्हीच सगळ्या ग्रामपंचायत निवडणूकित निवडून येणार असल्याचे सांगून नाणार प्रकल्पाला येथील 14 गावातील लोकांचा ठाम विरोध असल्याचेही जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी सांगितले.









