नाटे येथे खलाशाचा पाण्यात बुडून मृत्यू

राजापूर:- तालुक्यातील नाटे परिसरात एका मच्छीमार बोटीवर काम करणाऱ्या झारखंड येथील खलाशाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ५ डिसेंबर रोजी ही घटना घडली असून, ६ डिसेंबर रोजी राजापूर ग्रामीण रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आले.

मयत सुप्रीयन मिंज (वय ५६, रा. तमडा, थाना सिमडेगा, राज्य झारखंड) हा ओमकार रामकृष्ण पेडणेकर यांच्या बोटीवर २ डिसेंबर पासून खलाशी म्हणून कार्यरत होता. त्याच्यासोबत विनय केरकट्टा आणि सिसिर केरकट्टा हे दोन सहकारी काम करत होते.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.०० वाजण्याच्या सुमारास मयत सुप्रीयन मिंज हे खाडीच्या बाजूला असलेल्या वहाळामध्ये (ओढ्यात) अंघोळीसाठी गेले होते. त्यानंतर रात्री ९.३० वाजता त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत जेवण केले. जेवणानंतर सहकाऱ्यांनी त्यांना बोटीच्या केबिनमध्ये झोपण्यासाठी बोलावले असता, मयत हे तिथेच बसून राहिले. दुसऱ्या दिवशी, म्हणजे ५ डिसेंबर रोजी सकाळी सहकाऱ्यांनी त्यांचा शोध घेतला. त्यावेळी सुप्रीयन मिंज हे वहाळाच्या पाण्यात उपड्या अवस्थेत (उताणा) आढळून आले. त्यांना बाहेर काढले असता, त्यांच्या डोळ्याच्या बाजूला मुका मार लागलेला होता आणि डाव्या डोळ्याच्या पापणीला जखम झालेली दिसून आली.

तात्काळ त्यांना खासगी रुग्णवाहिकेने राजापूर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून सुप्रीयन मिंज यांना मृत घोषित केले. या घटनेची नाटे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.