राजापूर:- तालुक्यातील नाटे बाजारपेठेतील एका इमारतीला लागलेली आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. या आगीमध्ये सात व्यावसायिकांचे सुमारे १८ लाख रुपये तर इमारतीचे सुमारे ८ लाख रुपये असे एकूण २६ लाख ५९ हजार ४५५ रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपद्ग्रस्तांची भेट घेऊन आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेनंतर पोलीस तसेच महसूल व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पावसकर यांच्या इमारतीच्या बांधकामाचे ८ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
या इमारतीत व्यवसाय करणाऱ्या प्रसाद पाखरे यांच्या फोटो स्टुडिओचे ४ लाख १७ हजार, केदार ठाकूर यांच्या कापड आणि प्लास्टिक दुकानाचे ३ लाख ३५ हजार, विनोद शेलार यांच्या चायनीज सेंटरचे २ लाख हजार, प्रदीप मयेकर यांच्या टेलरिंग शॉपचे १ लाख ३६ हजार ४०० रुपये, निकिता गोसावी यांच्या ब्युटी ५५ पार्लरचे १ लाख १३ हजार ७०० रुपये, नारायण गोसावी यांच्या कटलरी दुकानाचे ८ लाख ९७ हजार ३५५ रूपये व दिगंबर गिजम यांच्या उपहारगृहाचे ५२ हजार रुपये इतके नुकसान झाले आहे.
नुकसान झालेल्या टेलरिंग व्यावसायिकांना स्थानिक व्यापारी मंडळाच्यावतीने मदत करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. राजापूर तालुका शिवसेना विधानसभा क्षेत्र संघटक रामचंद्र सरवणकर, तालुका प्रमुख कमलाकर कदम, उपतालुका प्रमुख अनंत गोटम, संतोष हातणकर, दिवाकर मयेकर, मंगेश गुरव, गणेश गिरकर, संजय पेडणेकर उपस्थित होते.