नाचणे रोडवर चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

फरार चारचाकी चालकाविरोधात गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील नाचणे रोड परिसरात भरधाव वेगातील चारचाकीने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून, अज्ञात चारचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी समीर सुरेश पाटील हे त्यांच्या अॅक्टिव्हा गाडी ( MH-08-5-7447) ने रत्नागिरी एस.टी. स्टँड येथून अभ्युदय नगरकडे जात होते. दुपारी सुमारे २.१५ वाजण्याच्या सुमारास ते नाचणे रोडवरील इब्राहीम सन्स यांच्या दुकानासमोर आले असता, कार्निवलच्या गल्लीतून भरधाव वेगात आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या अज्ञात चारचाकी गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात समीर पाटील यांच्या उजव्या हाताच्या खांद्याला फ्रॅक्चर झाले असून, त्यांना किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर चारचाकीचा चालक कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून फरार झाला.

याप्रकरणी समीर पाटील यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अज्ञात चारचाकी चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या १८४, १३४ (ख)/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.