रत्नागिरी:- शहरानजीकच्या नाचणे येथील वृध्दाने अज्ञात कारणातून राहत्या घराच्या मागील बाजूस असलेल्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. निलाप्पा सायबन्नाप्पा काळू (75 मुळ रा.अळूर जि.उस्मानाबाद सध्या रा.शांतीनगर नाचणे,रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या वृध्दाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता.२०) सायंकाळच्या सुमारास घडली. याबाबत त्यांचा मुलगा प्रकाश निलाप्पा काळू यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली.
त्यानुसार, सोमवारी प्रकाश काळू हे कामावर असताना त्यांच्या बहिणीने त्यांना फोन करुन आपल्या वडिलांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या रामफळाच्या झाडाला दोरीने गळफास घेतल्याचे सांगितले. मुलगा प्रकाश याने घरी जाऊन पाहिले असता त्याला वडिल झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांची कोणतीही हालचाल होत नसल्यामुळे प्रकाश काळू यांनी वडिलांना खाली उतरवून त्याच्या ओळखीचे प्रदिप पाटील यांना याबाबत माहिती दिली. प्रदिप पाटील यांनी शहर पोलिसांना फोन करुन बोलावून घेतले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.