रत्नागिरी:- जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर नगरपालीका तर लांजा, देवरूख, गुहागर या नगर पंचायतींसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत प्रस्तावित केलेल्या विकासकामांच्या साडेसात कोटीच्या प्रस्तावांना नगर विकास विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे. यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रयत्न केले होते.
दलितवस्ती सुधारणा प्रस्तावापैकी जिल्हा वार्षिक योजना अनुसूचीत जाती उपाययोजनेंतर्गत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण रत्नागिरी यांच्याकडून 2022-23 या आर्थिक वर्षासाठी सुमारे 7 कोटी 3 लाख रुपये मंजूर असून जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्या खात्यामध्ये शिल्लक असलेले सुमारे 2 कोटी 65 लाखाचे अनुदान असे अंदाजित 7 कोटी 7 लाख रूपयांच्या प्रस्तावांसाठी मान्यता देण्यात येत असून उपलब्ध अनुदानाव्यतिरिक्त जादा लागणारा निधी हा संबंधित नगरपालीका, नगर पंचायत यांनी त्यांच्याकडील 5 टक्के दुर्बल घटकांतर्गत निधीमधील राखीव निधी मधून करायचा आहे. जिल्ह्यातील पाच पालीका आणि तिन नगरपंचायतीना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलितवस्ती सुधारणा योजनेंतर्गत निधी मिळावा या साठी पालकमंत्री सामंत यांनी नगरविकास विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्याचे फलित म्हणून हा विकासनिधी मंजूर झाला आहे. हा निधी मंजूर झाल्याने तेथील विकास कामांना गती येणार आहे. दलितवस्ती सुधारणा योजनेतर्गंत रत्नागिरी नगरपालीकेला 2 कोटी 84 लाख, चिपळूणला 71 लाख 20 हजार, खेडला 75 लाख, लांजा 60 लाख, देवरुख नगरपंचायत 77 लाख, गुहागर नगरपंचायत 75 लाख तर राजापूर पालीकेला 65 लाख रुपयांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.









