नाखरे येथे कार- दुचाकी अपघातात तरुण आंबा व्यावसायिकाचा मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरीतून काम आटोपून घरी निघालेल्या नाखरेतील तरूण आंबा उद्योजक चंद्रवदन शैलेंद्र शिंदे-दसूरकर याच्या दुचाकीला इकोची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात चंद्रवदन यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी दुपारी 2.15 वा. च्या सुमारास पावस-नाखरे रोडवर झाला.

नाखरे येथील तरूण आंबा व्यावसायिक म्हणून ओळख असलेला चंद्रवदन शिंदे-दसूरकर याने वकिलीचेदेखील शिक्षण पूर्ण केले होते. मात्र हे यशस्वी आंबा व्यावसायिक म्हणून ओळखला जात होता. बुधवारी काळाचा घाला पडला आणि त्यातच त्याचा अपघाती मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार चंद्रवदन हा काही कामानिमित्त रत्नगिरीत आला होता. तेथील काम आटोपून दुपारच्या वेळेस तो नाखरे येथील आपल्या घरी जायला निघाला. आपल्या इलेक्ट्रीक बाईकवरून तो घरी जात होता.

चंद्रवदन हा पावसला पोहोचला त्याचवेळी त्याच्या वडीलांचा त्याला कॉला आला होता. मी पावसपर्यंत आलोय थोड्याचवेळात घरी पोहोचतोय असे चंद्रवदन यांनी आपल्या वडीलांना फोनवरून सांगितले आणि त्यानंतर तो पुन्हा नाखरेच्यादिशेने रवाना झाला.

पावस ते नाखरे असा जात असताना नाखरेकडून पावसकडे येणार्‍या इको कार आणि चंद्रवदन याच्या इलेक्ट्रीक बाईकची जोरदार धडक झाली. चंद्रवदन हा रस्त्यावर फेकला गेला आणि तो रक्ताच्या धारोळ्यात कोसळला.

या अपघाताची माहिती नाखरेच्या पोलीस पाटलांना सुरूवातीला मिळाली. त्यानुसार पावस येथे आलेले पोलीस पाटील आपली रिक्षा घेऊन नाखरेकडे तत्काळ निघाले. यावेळी चंद्रवदन हा रस्त्यात निपचित पडलेला त्यांना दिसून आला. सुरूवातीला ओळख पटत नव्हती मात्र इलेक्ट्रीक बाईकमुळे ओळख पटली.

या अपघाताची माहिती घरच्यांना मिळावी यासाठी पोलीस पाटील यांनी चंद्रवदन याचे घर गाठले त्याच्या वडीलांना चंद्रवदन याचा अपघात झाला आहे, त्याला किरकोळ दुखापत झाली आहे असे सांगितले मात्र अपघात गंभीर असल्याचे सांगण्याचे धाडस चंद्रवदन याच्या घरच्यांसमोर कोणाचेही झाले नाही.

आपल्या मुलाचा अपघात झाल्याची माहिती मिळताच त्याच्या वडीलांनी आपल्या कुटुंबियांसमवेत घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी चंद्रवदन याची पत्नीदेखील धावत सुटली होती. सारेजण घटनास्थळावर दाखल झाले आणि त्याठिकाणी एकच आक्रोश झाला.

चंद्रवदनचे आई-वडील, पत्नी व इतर नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी चंद्रवदन हा रस्त्यात निपचित पडला होता. सार्‍यांनी आक्रोश करायला सुरूवात केली. आपल्या पतीला रस्त्यात पडलेले पाहून पत्नीनेदेखील टाहो फोडला. हा आक्रोश पाहून सार्‍यांचेच काळीज हेलावून गेले.

घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर खासगी रूग्णवाहिकेतून चंद्रवदनचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणण्यात आला. याठिकाणी शवविच्छेदन करून मृतदेह सायंकाळी उशीरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

चंद्रवदन हा एक तरूण उद्योजक होता. दीड महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. त्याच्या अपघाताची माहिती वार्‍यासारखी सर्वत्र पसरली आणि त्यानंतर जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांसह मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती. चंद्रवदन याने वकिलीचे शिक्षणदेखील पूर्ण केले होते. तरूण वयातच तो यशस्वी आंबा उद्योजक म्हणून नावारूपाला आला होता. त्याच्या अपघाती निघनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.