नाईट कर्फ्यूबाबत जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाची प्रतिक्षा

रत्नागिरी:- नाईट कर्फ्यूबाबत जिल्ह्यात अद्याप निर्णय झालेला नसून एकीकडे थंडीचा कडाका वाढला असताना पर्यटकांचीदेखील वर्दळ वाढू लागली आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाची वाट पोलीस प्रशासन पहात आहे.

कोरोनासदृष्य नव्या व्हायरसमुळे पुन्हा एकदा धडकी भरल्याने मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी नाईट कर्फ्यूची घोषणा केली. मात्र त्याबाबतचा निर्णय हा प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी घेतील, असे सांगून निर्णयाचा चेंडू स्थानिक पातळीकडे सोपविला आहे. रायगडमध्ये नाईट कर्फ्यू जाहीर झाला असून लगतच्या रत्नागिरी जिल्ह्यात मात्र कर्फ्यूबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही.

जिल्हाधिकार्‍यांचा आदेश केव्हाही येऊ शकतो अशी शक्यता गृहित धरून पोलीस प्रशासनाने कर्फ्यूबाबत सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत कडकडीत कर्फ्यू लागू करण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत. त्यामुळे लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा नाईट कर्फ्यू लागू होणार आहे.