72 रुग्ण झाले कोरोनामुक्त; शून्य मृत्यूची नोंद
रत्नागिरी:- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ठिकठिकाणची कोविड आयसोलेशन केंद्र भरले आहेत. गाव-खेड्यांमध्ये कोरोना वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत शासकीय यंत्रणेवर भार कमी करण्याच्या उद्देशाने रत्नागिरी तालुक्यातील नांदीवडेतील सरपंच, उपसरपंच आणि गावकऱ्यांनी मिळून आयसोलेशन केंद्र उभारले आहे. लोकांसाठी लोकसहभागातून सुरू केलेले आयसोलेशन केंद्र अनेक गोरगरीब रुग्णांसाठी अत्यंत फायद्याचे ठरत आहे.
रत्नागिरी तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. रुग्णालये फुल्ल झाल्याने गावागावात आयसोलेशन सेंटर उभारून रुग्णांवर उपचार करण्याचा पायंडा नांदीवडे गावातून सुरू झाला. 12 मे रोजी या गावात आयसोलेशन सेंटर सुरू करत रुग्णसेवा हाती घेतली.
जयगड पंचक्रोशीत कोरोनाची परिस्थिती अतिशय भयानक होत चालली असताना स्थानिक ग्रामपंचायतीने पुढाकार घेत आयसोलेशन सेंटर सुरू केले. गरीब ग्रामीण जनतेला शहरात येऊन उपचारखर्च परवडणारा नसल्याने उपसरपंच विवेक सुर्वे यांनी जयगड हायस्कुलमध्ये आयसोलेशन सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. आरोग्य केंद्र खंडाळाचे सर्व कर्मचारी आणि डॉ. श्रुती कदम, डॉ. आशय जोशी, डॉ. श्री. जोग यांचे या उपक्रमाला मोलाचे सहकार्य मिळाले. आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाला या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपुलकीची सेवा दिली. आतापर्यंत जवळपास 72 रुग्ण या आयसोलेशन सेंटर मधून कोरोनावर मात करत घरी गेले आहेत. नांदीवडे, कचरे, संदखोल, कासारी, सांडेलावगण, जयगड येथील रुग्णांना या आयसोलेशन सेंटरचा फायदा होत असून या आयसोलेशन सेंटरमुळे जयगड पंचक्रोशीतील साथ आटोक्यात येण्यास मदत होत आहे.
आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल प्रत्येक पेशंटसाठी नांदीवडेचे उपसरपंच विवेक सुर्वे यांच्या घरामधून रोजचे दोनवेळेचे जेवण दिले जाते तसेच सरपंच आर्या गडदे यांच्याकडून दोनवेळचा नाष्टा दिला जातो. विशेष म्हणजे ग्रामकृतीदलामधील प्रसाद गुरव, तंटामुक्ती अध्यक्ष संकेत मेने, ग्राम सदस्य धर्मेंद्र आढाव, ग्राम कर्मचारी संगीता बंडबे आशा सेविका हे चौघे आयसोलेशन सेंटर मध्ये दाखल प्रत्येकी रुग्णाची काळजी घेतात. तर या उपक्रमाला भगवान शिरधनकर आणि चंद्रहास आढाव या दोन पोलीस पाटील यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.