विवेक सुर्वे यांची न्यायालयात धाव
रत्नागिरी:-जयगड मधील नांदिवडे ग्रामपंचायतीमधील प्रभाग क्रमांक एकची निवडणूक रद्दबातल करा अशी मागणी विद्यमान सदस्य तथा माजी पंचायत समिती सदस्य विवेक सुर्वे यांनी न्यायालयाकडे केली आहे. 2018 साली जिल्हाधिकारी यांनी सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आल्यानंतर सहा वर्षे निवडणूक लढवण्याचा अधिकार नसताना देखील निवडणूक लढवून विजयी झालेल्या सदस्य दीक्षा हळदणकर यांची निवड बेकायदेशीर असल्याने प्रभाग 1 ची निवडणूक रद्दबातल करा असा अर्ज सुर्वे यांनी केला आहे.
नांदिवडे प्रभाग एकमधून दीक्षा हळदणकर या विजयी झाल्या आहेत. त्यांना जिल्हाधिकारी यांनी 13 ऑगस्ट 2018 रोजी ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र केले होते. जिल्हाधिकारी यांनी हा निर्णय दिल्यानंतर सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्याचा अधिकार नसताना देखील हळदणकर यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधून उमेदवारी अर्ज भरला. 31 डिसेंबरच्या छाननीवेळी या उमेदवारी अर्जावर सुर्वे यांनी लेखी हरकत घेतली. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बेकायदेशीरपणे हरकत अमान्य करत उमेदवारी कायम ठेवल्याने सुर्वे यांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या तरतुदीनुसार दीक्षा हळदणकर यांना निवडणूक लढवण्याचा कोणताही अधिकार नाही. 2020-21 ची निवडणूक लढवण्यास त्या अपात्र होत्या. मात्र निवडणूक निर्णयाधिकारी यांनी हळदणकर यांचा उमेदवारी अर्ज बेकायदेशीररित्या वैध ठरवल्याने हळदणकर यांनी निवडणूक लढवली व त्या विजयी देखील झाल्या अस अर्जात नमूद करण्यात आले आहे.
अपात्र असताना निवडणूक लढवण्याचा अधिकार नसताना हळदणकर यांनी बेकायदेशीररीत्या निवडणूक लढवली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया बेकायदेशीर आहे. नांदीवडे प्रभाग 1 मधून निवडून आलेल्या हळदणकर यांची निवड बेकायदेशीर असून ही निवडणूक रद्दबातल ठरवण्यात यावी अशी मागणी सदस्य विवेक सुर्वे यांनी न्यायलयाकडे केली आहे.