रत्नागिरी:- नांदिवडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे पॅनल निवडून न आल्यामुळे शिवसैनिक म्हणवणारे संतोष हळदणकर व त्यांचा मित्र परिवार यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. वेडाच्या भरात त्यांनी पोटनिवडणुकीचा खर्च सादर न केल्याचा खोटा दावा दाखल केला आहे. कोणतीही माहिती न घेता त्यांनी हा उपद्व्याप केला असून केवळ सत्तेसाठी त्यांची धडपड दिसून येत असल्याचा आरोप नवनियुक्त सरपंच आर्या गडदे यांनी केला आहे.
23 जून 2019 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या खर्चाचा तपशील सौ. आर्या गडदे यांनी दिनांक 5 जुलै 2019 रोजीच सादर केलेला आहे. या बाबतचा पुरावा देखील त्यांनी सादर केला आहे. याउलट संतोष हळदणकर खोटी कामे करण्यात तरबेज आहेत. याचा प्रत्यय यापूर्वीही आलेला आहे. संतोष हळदणकर यांच्या पत्नी विरोधात पदाचा गैरवापर केल्याचा दावा दाखल असताना त्यांनी स्वतःच्या पत्नीला त्या दाव्या कामी दोघे विभक्त राहतो असे खोटे प्रतिज्ञापत्र तयार करायला लावले होते. त्याचाही पुरावा आपल्याकडे आहे असा दावा गडदे यांनी केला आहे. संतोष हळदणकर हे वेडाच्या भरात काहीही करू शकतात त्यामुळे अशा शुल्लक गोष्टी आम्ही फारशा मनाला लावून घेत नाही. जिल्हाधिकारी योग्य तोच निर्णय करतील मात्र संतोष हळदणकर गावातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सरपंच आर्या गडदे यांनी केला आहे.