नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना मिळणार वह्यांची पाने जोडलेली पाठ्यपुस्तके

रत्नागिरी:- शासनाच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांची पाने जोडलेली पाठ्यपुस्तके, शैक्षणिक वर्ष सन 2023-24 पासून पारदर्शी स्वरूपात उपलब्ध होणार आहेत. इयत्ता तिसरी ते दहावीच्या सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये ही योजना लागू करण्यात येणार आहे. या पाठ्यपुस्तकांमध्ये प्रत्येक घटक, पाठ, कविता, त्यांच्या शेवटी वहीची एक किंवा दोन पाने जोडण्यात येणार आहेत.

शिक्षक शिकवताना महत्त्वाच्या नोंदीही करून घेण्याची सोय होणार आहे तसेच वर्गकार्याचा स्तरही यानिमित्ताने समजून येणार आहे. शालेय शिक्षण विभागाकडून यासंदर्भात दोन मार्च रोजी एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये म्हटले आहे की, पाठ्यपुस्तके व वह्या यांच्या वजनाने दप्तराचे ओझे वाढणे, दप्तराच्या वाढत्या वजनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरित परिणाम, सोबतच राज्यातील खेडोपाडी असणार्‍या गरीब शेतकर्‍यांच्या मुलांना शाळेत शिकायला जाताना पुरेसे लेखन साहित्य उपलब्ध नसते. या सर्व मुद्द्यांचा विचार करून शिक्षण तज्ज्ञ, राज्य परीक्षा मंडळ, बालभारतीचे अधिकारी, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यासमवेत चर्चा करून त्यातून आलेल्या सकारात्मक प्रतिसादातून हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या पानांवर विद्यार्थ्यांनी शिक्षक शिकवित असताना महत्त्वाच्या मुद्द्यांच्या नोंदी करायच्या आहेत. जसे की शब्दार्थ, महत्त्वाची सुत्रे, महत्त्वाची वाक्ये, टिपण यांची नोंद करून ठेवायची आहे. शाळेमध्ये शिक्षक प्रत्यक्ष काय शिकतात त्याच्या नोंदीही या पानांवर करण्यात येणार असल्याने वर्गकार्याचा स्तर कसा आहे, हेही समजण्यास या उपक्रमातून मदत होणार आहे.
राज्यातील सर्व शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके एकात्मिक स्वरूपात एकूण चार भागांमध्ये विभागून तयार करण्यात येऊन त्यात वह्यांची पाने समाविष्ट केली जाणार आहेत.

कागदाच्या दरात झालेल्या वाढीमुळे पुस्तकांच्या किमतीवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे ‘समग्र शिक्षा’ योजनेंतर्गत व खुल्या बाजारात पुरवठा होणार्‍या सर्व पाठ्यपुस्तक मंडळाच्या मूल्यांकन सूत्रानुसार नव्याने मूल्यांकन करून त्यानुसार पुस्तकांच्या किमती निश्चित करण्यात येऊन ही पुस्तके चार विभागांत उपलब्ध करून द्यावीत, असेही या परिपत्रकात म्हटले आहे.