नव्या शैक्षणिक वर्षाचा आजपासून श्रीगणेशा; शाळा
प्रवेशोत्सवाने होणार विद्यार्थ्याचे स्वागत

रत्नागिरी:- नव्या 2023-24 या शैक्षणिक वर्षाच्या 15 जूनपासून होणार्‍या प्रारंभासाठी शिक्षण विभाग जय्यत तयारीत गुंतला आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी 2494 शाळांची प्रवेशोत्सव राबविण्यात येणार आहे. 51 हजार 381 जणांना मोफत गणवेश तर 1 लाख 16 हजार विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळणार आहे. जिल्हा परिषद शाळांची नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात होत आहे मुळात शिक्षक संख्या कमी आहे. आंतरजिल्हा बदलीमुळे तसेच सेवानिवृत्तीमुळे तब्बल 1900 पदे रिक्त आहेत. तसेच जिल्ह्यातील 479 नादुरुस्त झाल्या आहेत.

नव्या शैक्षणिक वर्षाला 15 जूनपासून सुरुवात होत आहे. विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी जिल्हा परिषदेचा शैक्षणिक विभाग सज्ज झाला आहे. असे असले तरी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सुरुवात ही शिक्षकांपासून होत आहे. गेल्या महिन्यात आंतरजिल्हा बदलीमुळे तब्बल 700 शिक्षक आंतरजिल्हा बदलीने परजिल्ह्यात गेले. गेल्या काही वर्षात ही संख्या हजार इतकी झाली आहे. त्यात सेवानिवृत्त होणार्‍यांची संख्याही वाढत जात आहे. सध्या 1900 पदे रिक्त आहेत. मंजूर पदे आणि सध्याची पदे बघितली तर 30 टक्के पदे रिक्त आहेत. यामुळे शिक्षणाचा गाडा कसा हाकवायचा ? असा प्रश्न शिक्षण विभागाला पडला आहे.

सध्या जिल्ह्यातील 161 शाळा शून्य शिक्षकी शाळा झाल्या आहेत. मंडणगड तालुक्यातील शिक्षकांची मंजूर पदे 420, रिक्त पदे 96, जिल्हा बदलीने सोडलेल्या शिक्षकांची संख्या 60, शून्य शिक्षकी शाळा 8, दापोली तालुक्यात शिक्षकांची मंजूर पदे 805, रिक्त पदे 253, जिल्हा बदलीने सोडलेल्या शिक्षकांची संख्या 87, शून्य शिक्षकी शाळा 22, खेड तालुक्यातील शिक्षकांची मंजूर पदे 961, रिक्त पदे 228, जिल्हा बदलीने सोडलेल्या शिक्षकांची संख्या 93, शून्य शिक्षकी शाळा 20, गुहागर तालुक्यातील शिक्षकांची मंजूर पदे 607, रिक्त पदे 199, जिल्हा बदलीने सोडलेल्या शिक्षकांची संख्या 79, शून्य शिक्षकी शाळा 17, चिपळूण तालुक्यातील शिक्षकांची मंजूर पदे 1001, रिक्त पदे 141, जिल्हा बदलीने सोडलेल्या शिक्षकांची संख्या 70, शून्य शिक्षकी शाळा 8, संगमेश्वर तालुक्यातील शिक्षकांची मंजूर पदे 1015, रिक्त पदे 287, जिल्हा बदलीने सोडलेल्या शिक्षकांची संख्या 99, शून्य शिक्षकी शाळा 28, रत्नागिरी तालुक्यातील शिक्षकांची मंजूर पदे 1001, रिक्त पदे 136, जिल्हा बदलीने सोडलेल्या शिक्षकांची संख्या 65, शून्य शिक्षकी शाळा 14, लांजा तालुक्यातील शिक्षकांची मंजूर पदे 632, रिक्त पदे 161, जिल्हा बदलीने सोडलेल्या शिक्षकांची संख्या 60, शून्य शिक्षकी शाळा 23, राजापूर तालुक्यातील शिक्षकांची मंजूर पदे 954, रिक्त पदे 251, जिल्हा बदलीने सोडलेल्या शिक्षकांची संख्या 112, शून्य शिक्षकी शाळा 21 एवढी संख्या आहे. यामुळे आता शाळांचा समतोल राखण्यासाठी या 161 शाळांमध्ये कामगिरी काढण्यात आली आहे. सध्यातरी शिक्षण विभागाने यावर कामगिरीचा तात्पुरता तोडगा काढला आहे.असे असले तरी पालकांमध्ये संतप्त भावना असणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या 479 प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी 17 कोटी 10 लाख 96 हजार रुपये, तर 84 नवीन वर्गखोल्यांसाठी 7 कोटी 14 लाख रुपये असा एकूण 24 कोटी 50 लाख 96 हजार रुपये निधीची आवश्यकता आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी कधी उपलब्ध होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या मोडकळीस आलेल्या नादुरुस्त शाळांपैकी 68 शाळांच्या निर्लेखनाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत, तर आणखी नादुरुस्त 56 प्राथमिक शाळा निर्लेखनासाठी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

पावसाळा लवकरच सुरू होणार आहे. जिल्ह्यात दरवर्षी मुसळधार पाऊस कोसळतो. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील 479 प्राथमिक शाळा नादुरुस्त असल्याने पावसाळ्यात होणार्‍या गळतीमुळे विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे घेताना त्रास सहन करावा लागणार आहे.