नव्या शिक्षक भरतीमधील शिक्षकांना जिल्हा बदली मिळणार नाही: ना. केसरकर

रत्नागिरी:- कमी पटसंख्येच्या शाळा कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही आणि नवीन शिक्षक भरतीमधील उमेदवारांना जिल्हा बदली मिळणार नसल्याचे दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

रत्नागिरीमध्ये शनिवारी सिंधुरत्न योजनेच्या कार्यालयाचा शुभारंभ शालेय शिक्षण मंत्री आणि सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांच्या हस्ते झाला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, यापुढे आता ‘क्वॉलिटी’ शिक्षणावर भर देण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी पुढील वर्षीपासून होणार आहे. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठे बदल घडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मागील काही दिवस विरोधक अर्ध्या माहितीच्या आधारे आरोप करीत आहेत. परंतु कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे हाल होणार नाहीत. या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विशेष भर देण्यात येणार आहे. राज्यात सुमारे 30 हजार नवीन शिक्षकांची भरती केली जाणार आहे. अनेक ठिकाणी स्थानिकांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली. परंतु न्यायालयाच्या निर्णयामुळे तसे करता येत नाही. परंतु जिल्हा बदल्यांमुळे शिक्षकांच्या रिक्त जागांचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे नवीन भरती झालेल्या शिक्षकांसाठी जिल्हा बदल्यांचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्षक पदांसाठी अर्ज करताना, उमेदवारांनी आपल्याला आयुष्यभर त्याच जिल्ह्यात त्याच शाळेत रहायचे आहे याचा विचार करुनच अर्ज भरावेत. त्यामुळे स्थानिक उमेदवारांनाही संधी राहिल असे ना. केसरकर यांनी स्पष्ट केले. याबाबत शिक्षकांच्या विविध संघटनांबाबत चर्चा करण्यात आली असून, त्यांनाही नवीन गोष्टी पटल्या आहेत.

राज्यातील जवळपास 26 जिल्ह्यांमधून शिक्षक भरतीचा आराखडा तयार झाला आहे. अद्याप तीन-चार जिल्ह्यांचा तयार व्हायचा आहे. येत्या 15 दिवसानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल, त्यानंतर भरतीची प्रक्रिया सुरु होईल असे त्यांनी स्पष्ट केले. दिल्ली पॅटर्नपेक्षा महाराष्ट्र पॅटर्न नक्कीच पुढे असेल असेही त्यांनी सांगितले.

सिंधुरत्नमधून रत्नागिरी जिल्ह्याला 27 कोटी
सिंधुरत्न योजनेमधून गतवेळी 2 कोटी 70 लाख रुपये निधी उपलब्ध झाला होता. त्यानंतर चालूवर्षी 27 कोटीचा निधी रत्नागिरी जिल्ह्यासाठी प्राप्त झाला आहे. या निधीचे वितरण येत्या दोन दिवसात विविध विभागांना केले जाईल. त्यानंतर हा निधी खर्ची पडण्यास सुरुवात झाल्यावर उर्वरीत 70 कोटीचा निधी मार्च अखेरपर्यंत प्राप्त होईल असे सिंधुरत्न समितीचे ÷अध्यक्ष दीपक केसरकर यांनी सांगितले.