नव्या बाल कोविड सेंटरमध्ये गैरसोयी; राहण्यास मातांचा नकार

रत्नागिरी:-सामाजिक न्याय भवन येथील कोविड सेंटरमधील लहान मुले आणि मातांनी आज आगीतुन फुफाट्यात, या म्हणीचा अनुभव घेतला. अचानक या बाधितांना त्या कोविड सेंटरमधून छत्रपती शिवाजी क्रीडांगणातील बॅडमिंडन कोर्टमध्ये लहान मुलांसाठी केलेल्या कोविड सेंटरमध्ये हलविले. मात्र तेथील गैरसोयीमुळे मातांनी तेथे राहण्यास विरोध केला. आम्हाला पुन्हा सामाजिक न्यायभूवन येथील सेंटरमध्ये हलवा, अशी मागणी लावून धरली. त्यामुळे काहीसा गोंधळ निर्माण झाला. अखेर मातांच्या मागणीवरून सायंकाळी आरोग्य विभागाने बाधितांना पुन्हा सामाजिक न्याय भूवन येथे हलविण्यात आले.

कोरोना बाधितांसाठी आरोग्य विभाग आणि प्रशासनाने अनेक ठिकाणी कोविड सेंटर उभारली आहेत. मात्र बहुतेक सेंटरबाबत बाधित आणि नातेवाईकांच्या तक्रारी आहेत. आरोग्य विभागावर ताण असला तरी प्रत्येक बाधित चांगली आरोग्य सुविधा मिळावी, अशी अपेक्षा बाळगून आहे. तशीच परिस्थिती आज सामाजिक न्याय भूवन येथील कोविड सेंटमध्ये उपचार घेणाऱ्या मुलांची आणि मातांची झाली. तिसऱ्या लाटेमध्ये  सर्वांत जास्त लहान मुले बाधित होण्याचा अंदाच आरोग्य यंत्रणेने बांधला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने त्याची पूर्वतयारी केली आहे. अनेक ठिकाणी लहान मुलांसाठी कोविड सेंटर उभारण्यात आली आहेत. मुलांची करमणूक व्हावी, यासाठी भिंतीची रंगरंगोटी, करमणुकीसाठी टीव्ही, खेळणी आदींची उपलब्धता करून दिली आहे. मात्र दुपारी अचानक तेथील बाधित मुले, मातांना लहान मुलांसाठी केलेल्या छत्रपती शिवाजी क्रीडांगणातील कोविड सेंटरमध्ये हलविण्यात आले. मात्र येथे खालीच गाद्या टाकण्यात आल्या आहेत. खाटांची सुविधा नाही. शौचालयाची कमतरता आहे, मुबलक पाणी नाही असा अडचणींचा पाढा वाचत मातांनी या सेंटरमध्ये राहण्यास नकार दिला. हे वातावरण योग्य नसल्याचे सांगितले. त्यामुळे काहीसा गोंधळ निर्माण झाला. आपण आगीतून फुफाट्यात पडल्याची भावना बाधितांची झाली.