रत्नागिरी:- सुधारित नळ पाणी पुरवठा योजनेमुळे पालिकेचा देखभाल दुरुस्तीवर वर्षाला होणारा सुमारे ५० लाखाचा खर्च वाचला आहे. सुधारित पाणी योजनेचे काम अजून २० टक्के शिल्लक असले तरी शहरवासीयांना मुबलक पाणी मिळत आहे. गळती आणि दुरुस्तीवरील हा खर्च वाचल्याने पालिकेला नवीन पाणी योजनेचा चांगला हातभार लागला आहे.
रत्नागिरी शहरवासीयांचे यावर्षापासून पाण्यापासूनची परवड थांबणार आहे. सुधारित ७३ कोटीची योजना पूर्ण अंतिम टप्प्यात आहे. या योजनेतून पाणी पुरवठा सुरू झाला आहे. पर्यायी नवीन जलवाहिनी टाकण्यात आली आहे. पालिकेच्या जुन्या जलवाहिनीतून ३० ते ४० टक्के गळती होती. त्यात जीर्ण झालेली जलवाहिनी वारंवार फुटत होती. त्यामुळे देखभाल दुरुस्ती करूनच पालिला जेरीस आली होती. वर्षाला दुरुस्तीवरच ५० लाख रुपये खर्च करावा लागत होता. एवढे करूनही शहरातील पाणी पुरवठ्यातील अनियमिततेमुळे ओरड होती. मात्र सुधारित पाणी योजनेमुळे गळतीचे प्रमाण थांबले. पाईपलाईन फुटण्याचे प्रकार थांबल्याने शहरवासीयांना आता नियमित आणि मुबलक पाणी मिळू लागले आहे.
शहरात सुमारे साडेदहा हजार नळ जोडणीधारक आहेत. त्यांना दिवसाला २० एमएलडी पाणी पुरवठा करावा लागतो. त्यासाठी शिळ जॅकवेलमधील तीन विद्युत पंप यापूर्वी २४ तास सुरू ठेवाले लागत होते. त्यामुळे महिल्याचे बिलदेखील लाखो रुपये येत होते. मात्र नवीन तीन विद्युत पंप बसविण्यात आले आहेत. जलवाहिनी नवीन असल्याने १२ तासात मुख्य टाकी भरते. त्यामुळे बिलातही बचत होत आहे. सर्व जोडण्यांना पालिकेने मीटर बसविले आहेत.