नवोदय महाविद्यालयात जिल्हा परिषदेतील विद्यार्थी सर्वाधिक

रत्नागिरी:- जिल्ह्यातील एकमेव नवोदय महाविद्यालयातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील स्थानिक विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा टक्का दरवर्षी वाढत आहे. यंदा 80 पैकी 56 विद्यार्थी जिल्हा परिषदेतील आहेत.

तिन वर्षांपुर्वी परजिल्ह्यातील विद्यार्थी नवोदयच्या प्रवेशासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांमध्ये प्रवेश घेत होते. त्यामुळे अनेक स्थानिक विद्यार्थ्यांना संधी मिळत नव्हती. यामध्ये काही स्थानिक शाळांमधील शिक्षकांचा हात असल्याचा विषय तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य दिपक नागले, संतोष थेराडे, परशुराम कदम, उदय बने यांनी सर्वसाधारण सभेमध्ये मांडला होता. वर्षभर याविषयावर चर्चाही झाली; मात्र तोडगा निघत नव्हता. अखेर जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड यांनी नवोदय विद्यालयाला भेट दिली आणि तेथील प्रशासनासाठी चर्चा केली. तसेच नवोदयच्या प्रवेशापुर्तेच जिल्हा परिषद शाळांमध्ये येणार्‍या परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर बंधने आणली गेली. या निर्णयाची कडक अंमलबजावणी 2020 पासून सुरु झाली. पहिल्याच वर्षी 21, दुसर्‍या वर्षी 48 आणि यंदा 56 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. या विद्यालयामध्ये सहावी इयत्तेत प्रवेश दिला जातो. यासाठी पाचवीतील विद्यार्थ्यांची परिक्षा घेतली जाते. ही परिक्षा देणारे विद्यार्थी हे स्थानिक शाळेत शिकत असावेत असा नियम आहे. ही केंद्र शासनाची निवासी शाळा असून येथील शिक्षण मोफत असते. रत्नागिरी जिल्ह्यातील पालकांना नवोदयच्या प्रवेशाबाबत तेवढी उत्स्कुता नव्हती. त्यामुळे परजिल्ह्यातून अनेक मुले नवोदयच्या प्रवेशासाठी रत्नागिरी जिल्ह्यात येत होती. जिल्ह्यातून झालेल्या उठावामुळे सध्या नवोदयमध्ये स्थानिक विद्यार्थी अधिक आहेत.