रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या मालकीची नवीन भाजी मार्केटची इमारत नव्याने बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जुन्या इमारतीतील गाळेधारकांची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. बेकायदेशीर प्रक्रियेने रत्नागिरी नगर परिषदेने गाळे ताब्यात घेऊ नयेत, यासाठी गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली होती.
रत्नागिरी नगर परिषदेच्या नवीन भाजी मार्केटची इमारत फारच जुनी झाली आहे. सुमारे ४५ वर्षे जुन्या या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. ही इमारत वापरण्यास धोकादायक असल्याचा अहवाल आल्यानंतर रत्नागिरी नगर परिषदेने गाळेधारकांना त्यांचे गाळे नगरपरिषदेच्या ताब्यात देण्याची नोटीस बजावली. या नोटीसला १९ गाळेधारकांनी न्यायालयात आव्हान देवून कायदेशीर कार्यवाही झाल्याशिवाय आमचे गाळे रनपने ताब्यात घेऊ नयेत, अशी न्यायालयाला विनंती केली होती.
नवीन भाजीमार्केटची इमारत फारच जुनी झाल्याने इमारतीतील स्लॅबचे, भिंतींचे तुकडे पडत होते. त्यामुळे तीन ते चारवेळा नोटीस देवून गाळे नगरपरिषदेच्या ताब्यात घेण्याची सूचना करण्यात आली. पावसाळ्यात तर नगरपरिषदेने या इमारतीच्या धोक्यासंदर्भात मोठा फलक सुद्धा लावला होता. न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिलेली नसल्याने रत्नागिरी नगरपरिषदेने ही इमारत पाडण्याचाही प्रयत्न केला. परंतू हा वाद न्यायालयात असल्याने गाळेधारकांनी विनंती केल्याने नगरपरिषदेचे पथक माघारी फिरले होते. आता मात्र दिवाणी न्यायालयाने गाळेधारकांची याचिकाच फेटाळून लावल्याने आता नवीन भाजीमार्केटची नवीन इमारत उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रत्नागिरी नगरपरिषदेतर्फे अॅड. निलांजन नाचणकर यांनी बाजू मांडली.