पाचल:- परिक्षेचा पेपर देऊन घरी परतताना गावातल्या नदीवर हातपाय धुण्यासाठी गेलेल्या युवकाचा नदीच्या पात्रातील दगडावर पाय घसरून बुडून मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी सकाळी राजापूर तालुक्यातील रायपाटण येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आज गुरुवार दिनांक 17 एप्रिल रोजी सकाळी जिजामाता विद्यामंदिर – रायपाटण या शाळेतील इयत्ता नववीत शिकत असलेला कुमार गंधार अमित पळसुलेदेसाई (वय वर्ष 15,राहणार रायपाटण बागवाडी) हा विद्यार्थी परीक्षेचा पेपर संपल्यानंतर गावच्या मांडावर खेळायला गेला. खेळून झाल्यावर मित्रांसोबत जवळच असलेल्या नदीवर हातपाय धुण्यासाठी गेला असता नदीच्या पात्रातील दगडावर पाय घसरून पाण्यात बुडाला. ही बातमी ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन तरुणाला पाण्यातून बाहेर काढले व जवळ असलेल्या ग्रामीण रुग्णालयात नेले असता तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
शवविच्छेदनानंतर देह तरुणाच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर सायंकाळी त्याच्यावर रायपाटण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्याच्या पश्च्यात त्याची आई,मोठा भाऊ, आजी आजोबा व परिवार आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याचं भागात दोन वर्षांपूर्वी गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तरुणांचा देखील मृत्यू झाला होता.आज घडलेल्या दुःखद घटनेनंतर परिसरात मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येतं आहे.