Friday, May 15, 2026
spot_img
Home रत्नागिरी नववर्षाच्या उत्साहात ‘मर्यादा’ पाळा: रत्नागिरी पोलिसांचा सक्त इशारा

नववर्षाच्या उत्साहात ‘मर्यादा’ पाळा: रत्नागिरी पोलिसांचा सक्त इशारा

रत्नागिरी:- जिल्ह्यात आणि पर जिल्ह्यातून नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. जिल्ह्याला लाभलेला समुद्रकिनारा आणि पर्यटन स्थळे पाहता, आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण आहे, मात्र या वातावरणात कोणीही कायद्याचे उल्लंघन करू नये. रत्नागिरी पोलीस दलाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अत्यंत कडक उपाययोजना आखलेल्या आहेत, याची नोंद घ्या.
पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात विशेष गस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत. हुल्लडबाजी किंवा महिलांची छेडछाड करणाऱ्यांवर साध्या वेशातील पोलीस पथके २४ तास नजर ठेवून आहेत आणि कठोर कारवाई निश्चित आहे. ३१ डिसेंबर २०२५ आणि ०१ जानेवारी २०२६ रोजी जल्लोष कार्यक्रमाच्या प्रत्येक ठिकाणावर विडियोग्राफी पथकांद्वारे सलग २४ तास करडी नजर ठेवली जाईल.
सर्वात महत्त्वाचा इशारा म्हणजे, मद्य प्राशन करून वाहन चालवल्यास कोणतीही गय केली जाणार नाही!. तुमच्यावर ब्रेथ ॲनालायजरने चाचणी करून तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात येत असून, नियम मोडणाऱ्यांवर कठोर दंड आकारला जाईल.
याशिवाय, नववर्षाच्या नावाखाली सोशल मीडियावर अश्लील किंवा आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास सायबर पोलीस ठाणे तुमच्यावर कारवाई करेल.
रत्नागिरी पोलीस दलाचे स्पष्ट आवाहन आहे की, तुम्ही कायद्याच्या बंधनांचे आणि वाहतुकीच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करा. जिल्ह्यातील समुद्र किनारे, गड-किल्ले आणि मंदिरे या पवित्र स्थळांचे पावित्र्य राखण्यासाठी दक्षता घ्या आणि सभ्य वर्तन ठेवा. पोलिसांना सहकार्य करा अन्यथा कारवाईला सामोरे जा. मदतीसाठी ‘डायल ११२’ हा क्रमांक २४ तास उपलब्ध आहे.