भाजपचा आरोप; रनपने स्वतंत्र निविदा काढल्याचा आरोप
रत्नागिरी:- शहराच्या विस्तारित नळपाणी योजनेत समाविष्ट असलेल्या कामांची स्वतंत्र निविदा पालिकेने काढली आहे. सुमारे एक कोटी रुपयांची २८ कामे स्वतंत्र निविदा काढून करण्यामागे पालिकेचा नेमका हेतू काय ? असा प्रश्न भाजपचे जिल्हा प्रवक्ते राजेश सावंत यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. भाजपाच्या जिल्हा कार्यालयात ते बोलत होते.
सुमारे ६३ कोटी रु .च्या विस्तारित नळपाणी योजनेचे काम शहरात सुरू आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तयार केलेल्या आराखड्यानुसार शहराच्या अंतर्गत भागातील पाईप बदलण्याची कामे योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. या कामांवर जीवन प्राधिकरणामार्फत सुपरव्हिजन सुरू आहे. असे असताना रत्नागिरी नगरपालिकेने स्थानिक वृत्तपत्रातून सुमारे २८ कामांची निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे अंतर्गत पाईपलाईन बदलण्याची सर्व कामे आहेत. नागरिकांच्या मागणीमुळे अत्यावश्यक कामे म्हणून निविदा काढण्यात आली असल्याचे पालिकेमार्फत सांगितले जात आहे, परंतु एकाच कामावर दोन वेळा पैसे खर्च करण्यामागील कारण काय ? अत्यावश्यक असेल तर नळपाणी योजनेच्या ठेकेदाराकडून ही कामे अगोदर का करून घेतली जात नाहीत. असा प्रश्न श्री. सावंत यांनी उपस्थित केला आहे.