राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांची मागणी
रत्नागिरी:- उद्योगमंत्री उदय सामंत गेली 19 वर्ष या मतदार संघाचे आमदार आहेत, ते येथील पालकमंत्री असून रत्नागिरीच्या नळपाणी योजनेत त्यांनी विशेष लक्ष घातले तरच ती परिपूर्ण होऊ शकते, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी मांडले. नळपाणी योजनेच्या दिरंगाईला जबाबदार असणार्यांवर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली असून, ठेकेदार आणि न.प. अधिकार्यांचे साटेलोटे असल्याचा आरोपही त्यांनी केला.
रत्नागिरी येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जानेवारी महिन्यापासून आपण या नळपाणी योजनेची व त्याला होणार्या दिरंगाईची चौकशी करावी अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. त्यानंतर याबाबत आपण जिल्हाधिकारी कार्यालयात स्मरण पत्रही दिले आहे. परंतु त्याकडे प्रशासनाने पूर्णत: दुर्लक्ष केले. आपल्या पत्राकडे लक्ष दिले असते तर शीळ येथील जॅकवेल पडल्यानंतर उद्भवलेली परिस्थिती निर्माण झाली नसती.
शीळ जॅकवेल उभारल्यास 30 ते 35 वर्ष झाली होती. तिचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची जबाबदारी कुणाची होती. ती न झाल्यामुळेच हा प्रकार घडला. परंतु त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली का, असा प्रश्न उपस्थित केला. एमआयडीसीकडून शहराला जादा दराने पाणी विकत घ्यावे लागत आहे. या पाण्याचे बीलाचा बोजा नागरिकांच्या माथ्यावरच बसणार असल्याचा आरोपही सुदेश मयेकर यांनी केला.
नळपाणी योजना पूर्ण होण्यास सहा वर्षाहून अधिक कालावधी गेला आहे. अद्यापही 80 टक्केच काम झाल्याचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे ती कधी पूर्ण होणार असा प्रश्न आहे. आराखड्यापेक्षा अधिक काम झाल्याचे सांगितले जात आहे. मग जीवन प्राधिकरणला तीन कोटी कशासाठी देण्यात आले. त्यांनी योग्य आराखडा का नाही तयार केला असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
रत्नागिरीचे पालकमंत्री असलेले उदय सामंत हे 19 वर्ष स्थानिक आमदार आहेत. नळपाणी योजना परिपूर्ण करुन घेण्याची त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी यात विशेष लक्ष घातल्यास ती लवकर पूर्ण होऊ शकते असेही त्यांनी सांगितले.
रत्नागिरी शहरातील प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण होत आहे. ही चांगली गोष्ट आहे. परंतु ते करताना नळपाणी योजनेची पाईप लाईन, गॅस लाईन, महावितरण, बीएसएनएलची लाईन अन्यत्र हलवण्यात येणार आहेत, परंतु या गोष्टीचा आदीच का विचार करण्यात आला नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.