नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी आता २१ डिसेंबरला!

उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

नागपूर:- राज्यभरात आज शांततेत पार पडत असलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण आदेश देत, सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी आता २१ डिसेंबर रोजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

या निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार, मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच उद्या, ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे आता मतमोजणीसाठी राज्यातील मतदार आणि उमेदवारांना जवळपास १८ दिवसांची अधिक वाट पाहावी लागणार आहे.

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या या आदेशामुळे, राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आता थेट २१ डिसेंबर रोजी जाहीर होतील. न्यायालयाच्या या निर्णयामुळे निकालाच्या तारखेत मोठा बदल झाला असून, या निर्णयाचे कारण काय आहे, याबद्दल अधिक तपशील लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. या बदललेल्या तारखेमुळे आता राजकीय पक्षांची पुढील रणनीती काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.