धोका निर्माण झाल्यास आम्ही जबाबदार; नवीन भाजी मार्केटमधील गाळेधारकांचे हमीपत्र

रत्नागिरी:- शहरातील धोकादायक नवीन भाजी मार्केट इमारतीतील वीज जोडणीसंदर्भात गाळेधारकांनी न्यायालयाला हमीपत्र दिले. खंडित वीज पुरवठा सुरू करून मिळण्याबाबत न्यायालयात मुद्दा उपस्थित झाला. त्यावेळी नगर परिषदेच्या वकीलांनी येथील वायरिंग फार जुने आहे. इमारतीला गळती लागलेली असल्याने सुरक्षिततेच्यादृष्टीने नगर परिषदेने या इमारतीतील वीज पुरवठा खंडित करण्यात आला असल्याचे सांगितले. गाळेधारकांनी कोणताही धोका निर्माण झाल्यास त्याला आम्ही जबाबदार राहू, असे हमीपत्र दिले. आता पुढील सुनावणी येत्या बुधवारी होणार आहे.

रत्नागिरी नगर परिषदेच्या मालकीची नवीन भाजी मार्केटची इमारत धोकादायक झाल्याने सात वर्षांपूर्वी गाळे रनपच्या ताब्यात देण्याबाबतची नोटीस बजावली. या नोटीस विरूद्ध गाळेधारकांनी न्यायालयात दाद मागून गाळे ताब्यात घेण्याबाबतच्या आणि वहिवाटीस रनपने अडथळा आणू नये, असा आदेश होण्याची न्यायालयाला विनंती केली आहे.
न्यायालयात याप्रकरणी गुरूवारी सुनावणी झाली. त्यावेळी गाळेधारकांकडून इमारतीचा वीज पुरवठा खंडित झाला असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर रनपचे वकील निलांजन नाचणकर यांनी इमारतीत येणार्‍या ग्राहकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने वीज पुरवठा खंडित करण्यात आला असल्याचे सांगितले. वीजेचा झटका, आग अथवा इतर दुर्घटना होवून जीवित, वित्त हानी होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली. गाळेधारकांनी अशा दुर्घटनेतून कोणतीही हानी झाल्यास नगर परिषद, महावितरण जबाबदार राहणार नाही. आम्ही जबाबदार राहू, असे हमीपत्र दिल्यास आमची वीज पुरवठा सुरू करण्याबाबत हरकत नसल्याचेही सांगितले. त्यानुसार रनपने महावितरणला वीज पुरवठा सुरू करून देण्याबाबतची विनंती केली असून, पुढील सुनावणी आता येत्या बुधवारी होणार आहे.