ठाकरेेंच्या युवासेनेकडून मागणी ; जिल्हाधिकार्यांना निवेदन
रत्नागिरी:- ज्या ठिकाणी भूस्खलन आणि आपत्कालीन परिस्थितीची शक्यता आहे, तेथील नागरीकांचे तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे अशी मागणी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेेचे तालुका युवा अधिकारी प्रसाद सावंत यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली.
युवासेनेच्या पदाधिकार्यांसह सावंत यांनी जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह यांची भेट घेतली. तसेच मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी भुस्खलन आणि पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामध्ये नागरिकांना प्रशासकीय मदतीची आवश्यकता भासते. अशावेळी प्रशासनाकडून तातडीने मदत देण्यासाठी आतापासूनच तयारी करावी अशी सुचनाही यावेळी सावंत यांनी केली. यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. यामध्ये जिल्हाधिकारी देवेंदरसिंह यांनी मागील काही दिवसात केलेल्या कामाबद्दल कौतुकही करण्यात आले आहे. चोविस तास जनतेच्या संपर्कात राहून त्यांच्या अडी अडचणी सोडवत असल्याबद्दल त्यांचा शाब्दिक गौरव करण्यात आला. तसेच भविष्यात जिथे भूस्खलन आणि आपत्कालीजनक परिस्थिती उदभवू शकते, त्या ठिकाणच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांचे योग्य पूनर्वसन करावे अशी मागणी केली आहे. भविष्यात जिल्ह्यामध्ये माळीन आणि ईर्शालवाडी सारख्या दुर्घटना टाळण्यावर प्रशासनाने भर द्यावा असे सांगण्यात आले. ग्रामीण भागातील साकव आणि पूल यांचीही परिस्थिती चांगली नाही, त्यामुळे संबंधीत विभागाला याबाबत सुचना देऊन तिथे आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी
करण्यात आली आहे.









