धोकादायक गणपतीपुळे समुद्रकिनारा बनला सेफ

 जयगड पोलिसांची कामगिरी; वर्षभरात एकाचाच मृत्यू

रत्नागिरी:- पर्यटकांकडून किनारपट्टीला अधिक पसंती दिली जात आहे. किनाऱ्यावर येणारे पर्यटक मौजमज्जा करण्यासाठी समुद्रात उतरतात. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने पर्यटकांचा बुडून मृत्यू होतो. गेल्या तेरा वर्षात केवळ गणपतीपुळे येथे २८ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. परंतु येथे केलेल्या उपाययोजनांमुळे सरत्या वर्षात केवळ एकाच पर्यटकाला आपला प्रण गमवावा लागला आहे. जयगड पोलीसांनी राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे पर्यटकांमध्ये काही प्रमाणात जागृती झाली आहे.

जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्याचे काम विविध स्तरावर सुरु आहे. तर कोरोनानंतर आता जिल्ह्यात येणार्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. गणपतीपुळे येथे दिवसभरात दहा हजारांहून अधिक पर्यटक हजेरी लावत आहेत. गणपतीपुळे समुद्रात आंघोळीसह पोहोण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांचा  बुडून मृत्यू होऊ नये यासाठी जयगड पोलीसांनी विविध उपाययोजन केल्या आहेत.

पर्यटक गणपतीपुळेच्या प्रवेशद्वारावर दाखल होताच समुद्रातील धोकादायक स्थितीची माहिती त्यांच्या कानावर पडते. यासाठी तेथील पोलीस चौकीत ध्वनीक्षेपक लावण्यात आले आहेत. तेथून पर्यटक किनार्यावर जातानाच मोठ्या बॅनरद्वारे धोकादायक समुद्राच्या माहितीसह आतापर्यंत बुडून मृत्यू झालेल्या पर्यटकांची संख्या पर्यटकांच्या नजरेस पडते. तर किनार्यावर असलेल्या व्यावसायिकांच्या मदतीने बुडणार्या पर्यटकांचे प्रण वाचविले जातात. किनार्यावर चौवीस पोलीस कर्मचार्यांची गस्त ठेवण्यात आली आहे. त्यामुळे खोल समुद्रात जाणार्या पर्यटकांना रोखण्याचे काम पोलीस कर्मचारी करतात.

मंदिर, ग्रमपंचायत मार्फत जीवरक्षक नेमण्यात आले असून त्यांना ट्युब, जॅकेट्स, दोरी, सर्च लाईट आदि साहित्य देण्यात आले आहेत. त्याचा वापर पर्यटकांना वाचविण्यासाठी केला जात असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी सांगितले. पर्यटकांचा बुडून मृत्यू होणार नाही याची खबरदारी पोलीस प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे वर्षभरात केवळ एकाच पर्यटकाचा बूडून मृत्यू झाला आहे. सन २००७ पासून २८ पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला होता. हे प्रमाण आता कमी होत असल्याचे श्री.ढेरे यांनी सांगितले.