रत्नागिरी:- धावत्या ट्रेनमधून उतरण्याच्या प्रयत्नात प्लॅटफॉर्म आणि गाडीच्या फटीत पडलेल्या एका ज्येष्ठ प्रवाशाचा जीव वाचवून रेल्वे सुरक्षा दलाच्या दोन जवानांनी आपल्या कर्तव्यनिष्ठा दाखवून दिल्या प्रत्यय आला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोकण रेल्वो अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी दोन्ही आरपीएफ कर्मचाऱयांसाठी प्रत्येकी 10,000/- चे रोख बक्षीस जाहीर केले आहे.
23 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता, ट्रेन क्रमांक 20112 कोकण कन्या एक्सप्रेस मडगाव स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून सुटत होती. गाडीने वेग घेतला असताना, मागील जनरल डब्यातून एक प्रवासी धावत्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी त्यांचा तोल जाऊन ते ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या अरुंद फटीत खाली पडले.
या गंभीर घटनेदरम्यान, प्लॅटफॉर्म क्र. 1 वर कर्तव्यावर असलेले आरपीएफचे आरक्षक कपिल सैनी आणि प्रधान आरक्षक आर. एस. भाई यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्वरित धाव घेतली. त्यांनी तातडीने तत्परता दाखवत त्या प्रवाशाला फटीतून बाहेर काढले आणि जीव वाचवला. जीवावर बेतलेल्या या दुर्घटनेतून वाचलेल्या प्रवाशाचे नाव गणेश लिम्राज श्रीदत्त (वय 66) आहे. ते मूळचे आडनी, जिल्हा उस्मानाबाद, महाराष्ट्र येथील रहिवासी आहेत. त्यांची तिकीट मडगाव ते थिवीम अशी होती. आरपीएफ जवानांच्या या धाडसी आणि वेळीच केलेल्या मदतीमुळे गणेश श्रीदत्त यांचा जीव वाचला. त्यांनी रेल्वे सुरक्षा दलाचे मनापासून आभार मानले.
रेल्वेच्या ‘ऑपरेशन जीवन रक्षा‘ मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या या प्रशंसनीय कार्याची नोंद घेत, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी आरक्षक कपिल सैनी आणि प्रधान आरक्षक आर. एस. भाई या दोन्ही जवानांना प्रत्येकी 10,000 रु. चे रोख बक्षीस जाहीर केले आहे.









