धान्य वाहतूकदाराना हमालानी पकडले कात्रीत

पुन्हा काम बंद ; नियमावर बोट ठरते अडचणीचे

रत्नागिरी:-एमआयडीसीतील एफसीआय (भारतीय अन्न महामंडळ) गोदामामधील हमालांच्या वाराईचा विषय अजून धुमसत आहे. ठेकेदार किंवा महामंडळ कोणीच वाराईची जबाबदारी घेत नसल्याने हमालांनीही नियमावर बोट ठेवले आहे. ट्रकचे जेवढ्या टनाचे पासिंग ( मान्य क्षमता) आहे, तेवढेच धान्य भरले जात असल्याने ठेकेदार अडचणीत आला आहे. ५ ते १० टन गाडीत कमी लोड भरला जात असल्याने ठेकेदाराला त्यासाठी डबल फेरी मारावी लागत असल्याने वाहतुकीचा खर्च अंगावर पडत आहे. हमालांनी पुन्हा काम बंद केले आहे.  

या वादाचा परिणाम धान्य वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर झाला असून महिन्याला होणाऱ्या ११ हजार टन धान्य उचलीपैकी फक्त ५० टक्के धान्य उचल होत आहे. हमालांनी पुन्हा काम बंद केल्याने धान्य वितरण व्यवस्था पुन्हा कोलमडण्याची शक्यता आहे. एफसीआय गोडाउनमध्ये गेल्या महिन्याच्या ४ तारखेपासून हमालांचा बंद सुरू होता. २२ दिवसांनी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी त्यामध्ये लक्ष घालून पर्याय काढण्याचे आश्वासन हमाल संघटनेला दिले होते. मात्र अजून त्यावर तोडगा निघालेला नाही. २०१७ पूर्वी वाराईची जबाबदारी ठेकेदारावर होती.  धान्य वाहतुकीच्या नवीन ठेक्यामध्ये ठेकेदाराने हमालांना वाराई द्यावी, असा कुठेही उल्लेख नाही. एफसीआय गोदामाचे हे हमाल असल्याने एफसीआय गोदाम प्रशासनाने त्यावर निर्णय घ्यावा, असे जिल्हा पुरवठा विभागाने पत्रही दिले आहे. मात्र त्यावर कोणताही निर्णय न झाल्यामुळे जिल्ह्यातील धान्य वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. गेल्या महिन्यातील धान्यच रास्त धान्य दुकानापर्यंत न पोहचल्याने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय झाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने काही प्रमाणात धान्य वाहतुक झाली होती. सध्या धान्य वितरण सुरळीत असल्याचे पुरवठा विभागाने सांगितले.
ठेकेदार, एफसीआय गोदाम किंवा जिल्हा प्रशासना यांच्याकडुन  हमालांच्या मागणीचा कोणताही विचार होत नसल्याने हमाल देखील इरेला पेटले आहेत. त्यांनी सर्वांनाच कात्रीत पकडेल असून दोन दिवसांपासून ट्रकची जेवढ्या टनाची पासिंग क्षमता आहे, तेवढेच धान्य भरले जात आहे. यामुळे ठेकेदार अडचणीत आला आहे. पंचवीस ते तीस टन धान्य ट्रकच्या एका खेपेमध्ये जात होते त्यासाठी आता दोनदा फेरी मारावी लागत आहे. यामुळे वाहतुक खर्च वाढल्याने ठेकेदार मोठ्या अडचणीत सापडला आहे. वाराईचा प्रश्न सुटत नसल्याने धान्य पुरवठ्यावर याचा मोठा परिणाम होऊन यात सर्वसामान्य जनतेचे हाल होण्याची शक्यता आहे.  

धान्य उचल बंद, ३७ ट्रक गोदामाबाहेर

ठेकेदाराने एफसीआय गोडाउनमधुन धान्य उचल करण्यासाठी ३७ ट्रक गोदामाबाहेर उभे केले आहेत. मात्र हमाल आपल्या म्हणण्यावर ठाम असून त्यांनी आता धान्य उचलच बंद केल्याची माहिती ठेकेदाराने जिल्हा पुरवठा विभागाला दिली आहे.

हमालांना वाराई मंजूर ः कामगार आयुक्त

जिल्हा पुरवठा विभागाने हमालांच्या वाराईबाबत सहायक कामगार आयुक्तांकडे दाद मागितली होती. त्यामध्ये कामगार आयुक्तांनी स्पष्ट केले आहे की, नोंदीत माथाडी कामगारांना वाराई प्रत्येक टनाला ४० रुपये व रेशन दुकानादराच्या वाहनामध्ये भरण्याचा दर ३ रुपये होता. १ ऑगस्ट २०१८ पासून वारणीच्या दरमध्ये प्रती टन ५० रुपये व रेशन दुकानदाराच्या वाहनामध्ये भरण्याचा दर ४ रुपये प्रती बॅग (५० किलो) या प्रमाणे दर मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे हमालांना वारई मंजूर असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.