धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस; पाणीसाठा पन्नास टक्क्यांवर

रत्नागिरी:- यंदा उशीर केलेल्या मोसमी पावसाने आता सक्रिय होताना केवळ दहा दिवसांतच जलसंचय समाधानकारक झाला आहे. मोसमी पावसाला विलंब झाल्याने खालावलेल्या जलसंचयाला बळ मिळाले असून कोकण विभागातील 173 प्रकल्पात 54.30 टीएमसी जलसंचय झला आहे. मे अखेरीस असलेल्या 30 टक्के जलसाठ्यात मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर साडेसहा टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे कोकणातील अनेक भागात असेलेली पाणीटंचाई काही प्रमाणात निवळली आहे.

यावर्षी मोसमी पाऊस वातावरणीय प्रतिकुलतेने कोकणात दाखल होण्यास विलंब झाला. त्यानंतरही अडलेल्या स्थितीत असलेल्या मोसमी पावसाच्या सक्रियतेबाबत अडचणी झाल्या. जून महिना संपत आला तरी मोसमी पाऊस सक्रिय न झाल्याने कोकणासहीत अन्य विभागातही पेरण्या रखडल्या होत्या. अखेर जूनच्या अखेरिस मोसमी पाऊस 20 जूननंतर सक्रिय झाला. त्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात मोसमी पावसाचा विस्तार सर्वदूर झाला. मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर दहा दिवसाच्या सातत्यपूर्ण प्रवासाने आता पाणलोट क्षेत्रात सिंचनाला बळ मिळाले आहे. जून महिन्यात खालावलेल्या स्थितीत असलेल्या कोकणातील 173 धरण क्षेत्रातील पाणलोट क्षेत्रात आता सिंचनाची टक्केवारी वाढूू लागली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात तीन मध्यम आणि 62 लघू प्रकल्पात आता जलसंचय वाढू लागला आहे. पावसाने आता तब्बल 700 मि. मी. च्या सरासरीने सहा हजार मिमीची एकूण मजल गाठली आहे. तर जिल्ह्यातील सात प्रमुख नद्यांपैकी जगबुडी या प्रमुख नदीतील जलस्तराने इशारा पातळीही ओलांडली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील धरणेही संचयाने वधारली आहेत.

रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणार्‍या शिळ आणि पानवल धरणातील जलसाठाही आता पावसाच्या सातत्याने वाढू लागला आहे. त्यामुळे ग्रामीण तेसच शहरी भागात असलेली पाणी समस्या काही प्रमाणात सुटली आहे.