धनगरवाडीला विद्युत पुरवठ्यासाठी १३ लाखाचे अंदाजपत्र होणार

रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील दख्खन धनगरवाडीतील दुर्लक्षित राहिलेल्या त्या नऊ कुटुंबांनी २०१४ मध्ये वीज मीटर मिळावे, यासाठी पैसे भरुन देखील महावितरण कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे उघड झाले आहे. त्याच्या पावत्या फोंड यांनी सादर केल्या आहेत. याची दखळ नवीन कार्यकारी अभियंता जितेंद्र फुलपगारे यांनी घेतली आहे. याबाबत देवरुखच्या अभियंत्यांशी चर्चा करून सुमारे ४ किमी जंगलामध्ये असलेल्या या धरनगरवाडीला मागेल त्याला वीज या योजनेतून विद्युत पुरवठा करण्याचा प्रस्ताव तत्काळ तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सुमारे अकरा ते तेरा लाखाचे हे अंदाजपत्र होण्याची शक्यता आहे.

धनगरवाडीतील ९ कुटुंबे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असलो तरी ते अजुन अंधारातच आहेत. ही अतिशय दुर्दैवी बाब पुढे आली आहे. याबाबत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता अनेक गंभीर बाबी पुढे आल्या. महावितरण कंपनीकडे २०१४ ला वीज मीटरसाठी पैसे भरल्याचे तेथील कुटुंबियांकडे पावत्या आहेत. परंतु आजपर्यंत देवरुख येथील वायरमन व अधिकारी फक्त येऊन पाहणी करून जात होते. लवकरच आपले काम होईल, असे सांगुन ते वेळ मारून नेत असल्याचे सांगितले. या गोष्टीला अकरा वर्षे होऊन सुद्ध महावितरणच्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हा प्रस्ताव आलेला नाही, ही एक गंभीर बाब समोर आली. तेथील ९ कुटुंबातील ३७ लोकांना मतदान ओळखपत्र आहेत. अनेक लोकप्रतिनिधी मतदानासाठी त्यांच्याकडे
जाता.

परंतु या वाढीचे नावाची नोंद संबंधित ग्रामपंचयतीत नसल्यामुळे आम्ही तिथपर्यंत पोहचु शकलो नसल्याचा दावा महावितरण कंपनीने केले आहे. परंतु नवीन कार्यकारी अभियंता जितेंद्र फुलपगारे यांनी यो गोष्टीची गंभीर दखल घेतली. त्यांनी तत्काळ देवरुख येथील अभियंत्याला याबाबत माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार धनगरवाडी ही जंगलामध्ये सुमारे ४ किमी अंतरावर आहे. त्यासाठी प्रत्येक किमीला १५ विद्युत खांब या प्रमाणे ६० खांब टाकावे लागतील, एक ट्रान्सफॉर्मर बसवावा लागेल, लघु वाहिनी ओढावी लागेल. जंगलमय भागात विद्युत खांब नेणे कठीण आहे. परंतु मागेल त्याला वीज जोडणी ही शासनाची योजना आहे. त्यामुळे त्या योजनेतून याचे अंदाजपत्र तत्काळ करण्याचे आदेश दिले आहेत. यावर लवकरच कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन फुलपगारे यांनी दिले.